मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. नाशिक जिल्ह्यातील आणि धुळे लोकसभा मतदारसंघातील असलेल्या बागलाण विधानसभा मतदारसंघात पुन्हा राष्ट्रवादीच्या आमदार दीपिका चव्हाण आणि भाजपचे दिलीप बोरसे यांच्यात थेट लढत होणार असल्याची चर्चा आहे. मात्र अजूनही दोन्ही पक्षांची उमदेवारी जाहीर झाली नसल्याने पक्षातील नव्याने असलेल्या इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. मात्र असे असले तरीही, १९९० पासून बागलाण विधानसभा मतदारसंघ माजी आमदार दिलीप बोरसे व माजी आमदार संजय चव्हाण यांच्याच कुटुंबाच्या वाट्याला आले असल्याचे पहायला मिळत आहे.
बागलाण विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी राखीव आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात भाजपा आणि राष्ट्रवादी यांच्यात अतिशय चुरशीच्या झालेल्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दीपिका चव्हाण यांनी बाजी मारली होती. चव्हाण यांचा ४ हजार१८१ मताधिक्क्य घेऊन विजयी झाला होता. तर त्यांना ६८ हजार ४३४ एकूण मते मिळाली होती. तर भाजपचे उमेदवार दिलीप बोरसे यांना ६४ हजार २५३ मते मिळाली होती. विशेष म्हणजे दीपिका चव्हाण यांनी बागलाणमधून प्रथम महिला आमदार म्हणून निवडून येण्याचा मान मिळविला होता.
बागलाणमध्ये युतीकडून भाजप तर आघाडीकडून राष्ट्रवादीकडे जागा राहणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील बागलाण विधानसभा मतदारसंघाने भाजपचे डॉ. सुभाष भामरे यांना ७२ हजार मतांची दिलेली आघाडी, विधानसभा निवडणुकीत विजयाच्या राजमार्गापर्यंत घेऊन जाईल अशी अपेक्षा भाजपच्या उमेदवाराला असणार आहे. त्यातच सन १९६२ पासून २०१४ पर्यंत लक्ष्मण तोताराम पवार यांचा अपवाद वगळता एकदाही आमदार दुसऱ्यांदा निवडून देण्याची परंपरा या मतदारसंघाने जोपासलेली नाही. यामुळे आगामी निवडणूकदेखील बोरसे व चव्हाण यांच्यासाठी अत्यंत अटीतटीची होणार असल्याची चर्चा आहे.
विधानसभा २०१४ मध्ये झालेले मतदान
दीपिका चव्हाण (राष्ट्रवादी) : ६८,४३४
दिलीप बोरसे (भाजप) : ६४२५३
साधना गवळी (शिवसेना) : ९,१०८
जयश्री बर्डे (काँग्रेस) : ६,९४६