औरंगाबाद : सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा यांना ‘बाहुबली पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले आहे. हा सन्मान श्रवणबेळगोळ येथील भगवान गोमटेश महामस्तकाभिषेक सोहळा व विश्व जैन डॉक्टर्स संमेलनाच्या वेळी चिन्मय सागर चॅरिटेबल ट्रस्ट (भाटापारा, छत्तीसगढ)च्या वतीने प्रदान करण्यात आला. दर १२ वर्षांनी भगवान बाहुबली स्वामींचा महामस्तकाभिषेक होत असतो.विश्व जैन डॉक्टर्स फोरमचे अध्यक्ष डॉ. सन्मती ठोळे यांनी सांगितले की, औरंगाबाद सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा यांनी जैन समाजातील सर्व पंथांना एकत्र आणून एकता व एकजुटीचा आदर्श निर्माण केला. यामुळे औरंगाबादेत जैन समाजाची प्रगती झाली. आज संपूर्ण देशात येथील समाजाचे आदराने नाव घेतले जात आहे. डॉ. ठोले पुढे म्हणाले की, १७ ते २४ फेब्रुवारीदरम्यान श्रवणबेळगोळ येथे मोठा सोहळा पार पडला. यात विश्व जैन डॉक्टर्स फोरम आणि चिन्मय सागर चॅरिटेबल ट्रस्टद्वारा राजेंद्र दर्डा यांना ‘बाहुबली पुरस्कार’ प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला; परंतु त्यावेळी दर्डा हे श्रवणबेळगोळ येथे काही कारणास्तव पोहोचू शकले नाही. यामुळे आम्ही हा पुरस्कार औरंगाबादेत आणला व महावीर जन्मकल्याणक महोत्सवाच्या दिवशी त्यांना प्रदान केला.पुरस्कार वितरणाचे आयोजन सरस्वती भुवन महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले होते. पुरस्कार स्वीकारताना राजेंद्र दर्डा यांनी सांगितले की, हा पुरस्कार संपूर्ण औरंगाबाद सकल जैन समाजाचा आहे. समाजबांधवांनी एकजूट होऊन समाजाला ताकदवान बनविले. या पुरस्काराचा मी केवळ समाजाचा प्रतिनिधी म्हणून स्वीकार करीत आहे. उल्लेखनीय म्हणजे, हा पुरस्कार त्याग, अहिंसा, सत्य, एकता या चार सूत्रांचे पालन करणाऱ्यांनाच प्रदान केला जातो. यावेळी सकल जैन समाजाचे कार्याध्यक्ष आ. सुभाष झांबड, महासचिव महावीर पाटणी, महावीर जन्मकल्याणक महोत्सव समिती २०१८ चे अध्यक्ष विनोद बोकडिया, ऋषभ कासलीवाल, डॉ. प्रकाश झांबड, विलास साहुजी, रवी मुगदिया आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
राजेंद्र दर्डा यांना ‘बाहुबली पुरस्कार’ प्रदान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2018 10:08 PM