ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 02- बॉक्स आॅफिसवरील सर्व विक्रम मोडीत काढणा-या ‘बाहुबली 2’ मुळे जिल्ह्यामधून अवघ्या एकाच महिन्यात तब्बल बारा कोटी 58 लाखांचा करमणूक कर प्रशासनाला मिळाला आहे. एका महिन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर कर मिळवून देणारा आजवरचा बाहुबली हा एकमेव सिनेमा ठरला आहे.
शहरातील 25 मल्टीप्लेक्स, मल्टी स्क्रिन आणि 31 सिनेमागृहांमधून महिन्याला साधारणपणे चार कोटींच्या आसपास करमणूक कर मिळतो. 28 एप्रिल रोजी ‘बाहुबली 2’ हिंदी, तेलुगूसह पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला. या सिनेमाला प्रेक्षकांचाही उत्तम प्रतिसाद लाभला. पुणे जिल्ह्यातील जवळपास सर्वच सिनेमागृहांमध्ये या चित्रपटाचे तीन पेक्षा जास्त खेळ चालू आहेत. सिनेमा येऊन एक महिना उलटल्यानंतरही तिकीटबारीवर अद्यापही बाहुबलीच ‘भाव’ खात आहे.
हा सिनेमा जिल्हा प्रशासनाच्या मात्र पथ्यावर पडला असून एका महिन्यातच 12 कोटी 58 लाखांचा करमणूककर प्रशासनाच्या तिजोरीत जमा झाला आहे. ‘बाहुबली 2’ मुळे आजवरचा सर्वाधिक कर मिळाला आहे. आगामी काळात ट्युबलाईट, रोबो सारखे बिगबजेट सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. या चित्रपटांमधूनही चांगला कर मिळण्याची शक्यता करमणूक कर विभागाच्या तहसीलदार सुषमा पाटील-चौधरी यांनी सांगितले.