औरंगाबाद : औरंगाबादेतील प्रख्यात वन्यजीव छायाचित्रकार बैजू पाटील यांनी फेडरेशन इंटरनॅशनल आर्ट फोटोग्राफी (एफआयएपी) या जागतिक फोटोग्राफी स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून भारताची मान जगात उंचावली आहे. युरोपमधील सर्बिया येथे दर दोन वर्षांनी घेण्यात येणाऱ्या या स्पर्धेत तब्बल ४५ देशांनी सहभाग घेतला होता, हे विशेष!जागतिकस्तरावर ही स्पर्धा अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते. बैजू पाटली यांना उत्कृष्ट फोटोग्राफीबद्दल आतार्पंयत अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. सोमवारी बैजू यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, छायाचित्रणामध्ये ‘एफआयएपी’ ही स्पर्धा अतिशय प्रतिष्ठेची मानली जाते. मागील सहा वर्षांपासून मी या स्पर्धेत सहभाग घेत आहे. २०१४मध्ये या स्पर्धेत मला कांस्यपदक मिळाले होते. या स्पर्धेत सहभागी प्रत्येक देशातील ५ ते १० उत्कृष्ट वन्यजीव छायाचित्रे मागविली जातात. भारतातून बंगळुरू, कोलकाता, चेन्नई येथील वन्यजीव छायाचित्रकार या स्पर्धेत भाग घेत असले तरी आपल्या देशाला सुवर्णपदक मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. जून २०१६मध्ये फेडरेशन इंटरनॅशनल आर्ट फोटोग्राफी (एफआयएपी) या स्पर्धेसाठी त्यांनी आपला फोटो पाठविला.खोकड हा अत्यंत संवेदनशील, लाजाळू आणि भित्रा प्राणी आहे. त्याचे छायाचित्र टिपणे हे वाटते तेवढे सोपे नाही. खोकड हा सूर्यास्तानंतर त्याच्या निवाऱ्यातून बाहेर निघतो व सूर्योदयापूर्वी तो आत जाऊन बसतो. स्वच्छ प्रकाशात त्याचे फोटो घेणे सहज शक्य होत नाही. खोकडाचे फोटो काढण्यासाठी बैजू यांनी मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आदी ठिकाणची अभयारण्ये पालथी घातली; पण त्यांनी खोकडाचा उत्कृष्ट फोटो काढला तो बीड जिल्ह्यातील टागरगाव (ता. शिरूर कासार) परिसरात. परिसर अत्यंत शुष्क होता. कोरड्या तलावाजवळून गेलेल्या पाईपलाईनमधून थेंब थेंब पाणी गळत होते. तेथे पाणी पिण्यासाठी काही जंगली प्राणी येत असल्याचे स्थानिक नागरिकांकडून समजले होते. हा फोटो घेण्यासाठी त्यांना परिसरात सलग ७ ते ८ दिवस थांबावे लागले.खोकडाला माणसाची चाहूल लागू नये म्हणून मला अंगाला शेण फासून गवतामध्ये दडून बसावे लागले. अखेर एकेरात्री खोकड गवतातून बाहेर आले व समोर बसले. त्याचा फोटो टिपणार तोच लगेच त्याची दोन पिलेही गवतातून बाहेर आली व आपल्या आईसोबत ती खेळू लागली. तो क्षण टिपण्याचा प्रयत्न केला. मात्र, कॅमेऱ्याची चाहूल लागताच पिले पुन्हा गवतात गेली. काही वेळाने पुन्हा एक पिलू बाहेर आले. आईचे चुंबन घेऊन ते खेळण्याच्या प्रयत्नात होते. तोच दुर्मिळ क्षण कॅमेऱ्यात टिपला, असे बैजू म्हणाले.हा फोटो फेब्रुवारी २०१६मध्ये काढला होता. या फोटोला सुवर्णपदक, अडीच लाख रुपये रोख असे पारितोषिक मिळाले आहे. बैजू यांना मिळालेला हा नववा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. (प्रतिनिधी)
बैजू पाटील यांना सुवर्णपदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2016 5:50 AM