मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड व त्यांचे पती जावेद आनंद यांची शुक्रवारी विशेष सीबीआय दंडाधिकाऱ्यांनी जामिनावर सुटका केली. फॉरेन कॉन्ट्रिब्युशन रेग्युलेशन्स अॅक्टचे(एफसीआरए) उल्लंघन केल्याचा आरोप सीबीआयने सेटलवाड यांच्यावर ठेवला आहे.एफसीआरएचे उल्लंघन करत, तिस्ता व जावेद यांनी सबरंग कम्युनिकेशन अँड पब्लिशिंग प्रा. लि. फोर्ड फाउंडेशनकडून २.९ लाख यूएस डॉलर देणगी स्वरूपात घेतले. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, गृहमंत्रालयाच्या परवानगीशिवाय पब्लिेकेशन कंपनी परदेशातून देणगी स्वीकारू शकत नाही. एफसीआरएनुसार, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमासाठी परदेशातून देणगी स्वीकारण्यापूर्वी गृहमंत्रालयाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. सेटलवाड यांनी फोर्ड फाउंडेशनकडून देणगी स्वीकारण्यापूर्वी गृहमंत्रालयाकडून परवानगी घेतली नाही, तसेच परदेशातून देणगी स्वीकारण्यासाठी स्वतंत्र बँक खातेही उघडले नाही, असे सीबीआयने दोषारोपपत्रात म्हटले आहे. तिस्ता सेटलवाड, जावेद आनंद आणि सुषमा रमण यांच्यावर भारतीय दंडसंहिता कलम १२० (ब) (कट रचणे), एफसीआरए २०१० आणि एफसीआरए १९७६ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
सेटलवाड यांना जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2017 12:33 AM