नवी दिल्ली- कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावानं अवघा देश थबकला आहे. अनेकांना घरातच थांबून राहावं लागल्यानं हातावर पोट असणाऱ्यांच्या हालाला पारावार उरलेला नाही. गोरगरीब जनता आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत सतावते आहे. विशेष म्हणजे गोरगरीब जनतेसाठी आरोग्य यंत्रणेला आणखी बळकट करण्यासाठी अनेक उद्योगपती पुढे सरसावले आहेत. देशातला नावाजलेला उद्योग समूह असलेला बजाज ग्रुपही सरकारच्या मदतीला धावून आला आहे. बजाज ग्रुपनं आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी १०० कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लोकांना चांगली आरोग्य सुविधा मिळणं आवश्यक आहे. त्यासाठी बजाज उद्योग समूह शक्य तितके प्रयत्न करणार आहे. बजाज समूहानं एक निवेदन प्रसिद्ध केले असून, त्यात सगळं नमूद करण्यात आलं आहे. बजाज समूहाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, रोजंदारीवर काम करणारे मजूर, बेघर आणि रस्त्यावर राहणाऱ्या मुलांनाही मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यांना अन्नधान्य पुरवठा, गृहनिर्माण, स्वच्छता आणि आरोग्य सेवांकडे पुरविण्याकडे अधिक लक्ष दिले जात असल्याचे कंपनीने म्हटले आहे. कोरोना विषाणूचा देशात मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यानंतर लोक आपल्या गावी परतत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या रकमेचा बहुतांश निधी हा ग्रामीण भागात खर्च केला जाणार आहे. कोरोनाविरोधातील या देशाच्या लढ्यात आम्ही १०० कोटी रुपयांचं योगदान देत आहोत. 200 एनजीओंसोबत आम्ही काम करत असून, शक्य तितक्या ग्रामीण भागात पोहोचण्यासाठी प्रयत्नशील आहोत. तसेच गरजू लोकांपर्यंत आवश्यक संसाधने पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
हमारा बजाज! मदतीसाठी कोट्यवधींची तिजोरी उघडली; पवारांनी केलं कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 1:15 PM