Bajrang Sonawane News: लोकसभा निवडणुकीत महायुतीतील अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. त्यातील भाजपाकडून बीडमध्ये उमेदवारी मिळालेल्या पंकजा मुंडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार गटाचे उमदेवार बजरंग सोनावणे यांनी पराभव केला. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झालेली पाहायला मिळाली. मराठा आंदोलनाचा मोठा परिणाम या निवडणुकीवर पाहायला मिळाला. तशी कबुलीही बजरंग सोनावणे यांनी दिली होती. यातच आता बजरंग सोनावणे यांनी एका प्रश्नाला दिलेल्या उत्तरावरून पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पत्रकारांशी बोलताना खासदार बजरंग सोनावणे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. शरद पवार गटाचे तुतारी आणि अपक्ष उमेदवारांना देण्यात आलेल्या पिपाणी या चिन्हातील साधर्म्यामुळे लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाला फटका बसल्यानंतर पक्षाने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. विधानसभेला खुल्या चिन्हांच्या यादीतून पिपाणी हे चिन्ह वगळावे, अशी मागणी शरद पवार गटाने आयोगाला पत्राद्वारे केली आहे. यावर बजरंग सोनावणे यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली.
पिपाणी हे चिन्ह बाद केले पाहिजे
ग्रामीण भागातील आमच्या मतदार बंधुंना गोंधळात टाकणारे हे चिन्ह आहे. कारण, आमचे चिन्ह तुतारीधारी माणूस आहे. तर, पिपाणी हे चिन्ह तुतारी नावानेच आयोगाकडे आहे. या पिपाणी चिन्हामुळे साताऱ्यातील आमच्या उमेदवाराचा पराभव झाला. कारण, विजया उमेदवारापेक्षा पिपाणीला जास्त मतदान मिळाले आहे, तर माझ्या मतदारसंघातही ५० हजारांपेक्षा जास्त मतदान पिपाणी या चिन्हाने घेतले. त्यामुळे, हे चिन्ह बाद केले पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे. या मागणीवर आपण आग्रही असल्याचे बजरंग सोनावणे म्हणाले.
बीड हा जिल्हा शरद पवार यांचाच आहे
लोकनेते गोपीनाथ मुंडेंचा बीड हा मतदारसंघ आहे, त्याच बीड लोकसभा मतदारसंघातून तुम्ही निवडून आलात. याबाबत बजरंग सोनावणे यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. यावर बोलताना, शरदचंद्र पवार यांचा बीड जिल्हा म्हणून माझ्या जन्माच्या अगोदरपासून ओळखला जातो आणि तो शरद पवार यांचाच जिल्हा आहे. बीडच्या जनतेमुळेच मी संसद सभागृहात पोहोचलो. दिल्लीच्या सर्वोच्च सभागृहात जाण्याचा बहुमान मला मिळाला. माझ्या या सर्व मानाची मानकरी माझी बीड जिल्ह्यातील जनता आहे, ज्यांनी माझ्यावर प्रेम केले त्या जनतेचे मी नतमस्तक होऊन आभार मानतो, असे बजरंग सोनावणे यांनी सांगितले.