बीड - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने बीडमधून विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांचे तिकीट कापून पंकजा मुंडे यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे अजित पवारांसोबत असल्याने याठिकाणी पंकजा मुंडे यांचा विजय खडतर नाही असं बोलले जाते. परंतु अजित पवार गटातील मोठा नेता शरद पवार गटात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
बजरंग सोनवणे हे धनंजय मुंडे आणि अजित पवारांसोबत होते. मात्र पंकजा मुंडे यांना लोकसभेची तिकीट जाहीर होताच बजरंग सोनवणे वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. बजरंग सोनवणे हे शरद पवारांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. बजरंग सोनवणे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. त्यात ते आगामी लोकसभा निवडणुकीबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. मागील लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभेची उमेदवारी लढवली होती. तेव्हा प्रीतम मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यात चुरशीची लढत झाली.
आता भाजपाने प्रीतम मुंडेऐवजी पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या बजरंग सोनवणे यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात घडामोडींना वेग आला आहे. बजरंग सोनवणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष असून ते सध्या अजित पवार गटात आहेत. येडेश्वरी साखर कारखानाच्या माध्यमातून सोनवणे यांनी शेतकरी आणि कार्यकर्त्यांची मजबूत फळी तयार केली आहे. गेल्या लोकसभेत त्यांना मोठ्या प्रमाणत मतदानही पडले होते.
बीड लोकसभेसाठी अद्याप शरद पवार गटाने कोणताही उमेदवार जाहीर केला नाही. त्यामुळे अजित पवार गटातून बजरंग सोनवणे हे शरद पवार गटात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बजरंग सोनवणे यांच्या बंगल्यावर मित्रमंडळाची आणि कार्यकर्त्यांची बैठक होत आहे. सोनवणे यांच्या कार्यकर्त्यांची काय भूमिका असेल? सोनवणे पक्ष सोडणार का? पुन्हा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सोनवणे-मुंडे अशी लढत पाहायला मिळणार का हे पुढील २-३ दिवसांत स्पष्ट होईल.