पुणे : वाकड येथील बालाजी इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीने संबंधित विद्यार्थ्याची कॉलेजकडे तक्रार करूनही त्या विद्यार्थ्यावर कारवाई का केली गेली नाही, याचा खुलासा कॉलेजकडून मागविला जाणार आहे. त्यानंतर त्या कॉलेजविरुद्ध योग्य ती कारवाई केली जाईल, असे कुलगुरू वासुदेव गाडे यांनी सोमवारी स्पष्ट केले.बालाजी कॉलेजमधील एका विद्यार्थ्याने त्याच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीवर सोमवारी प्राणघातक हल्ला केला. संबंधित विद्यार्थिनीने त्या विद्यार्थ्याची कॉलेजकडे तक्रार केली असल्याची माहिती उजेडात येत आहे. या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून त्या कॉलेजकडे खुलासा मागविण्यात येणार आहे. विद्यार्थिनीवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेचा गाडे यांनी तीव्र शब्दांमध्ये निषेध केला. महाविद्यालयांच्या स्थानिक व्यवस्थापन समितीवर विद्यार्थ्यांना प्रतिनिधित्व देण्यात यावे, याच्या सूचना महाविद्यालयांना करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयांमध्ये काऊन्सेलिंग सेल उभारणे आवश्यक असेल, तिथे विद्यार्थ्यांना त्यांच्या तक्रारी नोंदविता येतील, अशी माहिती वासुदेव गाडे यांनी दिली. (प्रतिनिधी)
बालाजी कॉलेजकडून खुलासा मागविणार
By admin | Published: April 04, 2017 12:58 AM