अहमदनगर : महाराष्ट्र कौन्सिल आॅफ इंडियन मेडिसीनने (एमसीआयएम) बालाजी तांबे प्रकरणात आता माहितीच देण्यास टाळाटाळ सुरू केली आहे. कौन्सिलच्या अध्यक्षांच्या परवानगीशिवाय काहीही माहिती देता येत नाही, असा अजब पवित्रा संस्थेच्या प्रबंधकांनी घेतला आहे. अध्यक्षांनीही याबाबत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. बालाजी तांबे हे स्वत:ला आयुर्वेदाचार्य असल्याचे सांगतात. प्रयाग येथील हिंदी साहित्य संमेलन या संस्थेची वैद्यविशारद पदवी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या पदवीच्या आधारे त्यांनी १९८७ साली कौन्सिलकडे नोंदणी केली. मात्र, त्यांच्या नोंदणीची काहीही कागदपत्रे कौन्सिलकडे नाहीत. स्वत: तांबे हेही वैद्यकीय पदवी हरवल्याचे सांगतात. त्यामुळे त्यांची मूळ नोंदणी कोणत्या प्रमाणपत्राद्वारे झाली, याबाबत साशंकता आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते गणेश बोऱ्हाडे यांनी तांबे यांची शैक्षणिक पात्रता व नोंदणीची कागदपत्रे कौन्सिलकडे मागितली. त्या वेळी कौन्सिलने त्यांची अभियांत्रिकी पदवी व जन्मतारखेचा दाखला दिला. मात्र वैद्यकीय प्रमाणपत्र उपलब्ध नसल्याचे कळविले.‘लोकमत’ने हे प्रकरण उजेडात आणल्यानंतर तांबे यांनी वैद्यकीय पदवीची एक झेरॉक्स प्रत कौन्सिलला आणून दिल्याचा खुलासा कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. आशुतोष गुप्ता यांनी वृत्तपत्रात केला. मात्र, हे प्रमाणपत्र व त्याच्या तपासणीसाठी कौन्सिलने संबंधित विद्यापीठाशी केलेल्या पत्रव्यवहाराची कागदपत्रे कौन्सिल दाखवत नाही. याबाबत बोऱ्हाडे यांनी कौन्सिलचे प्रबंधंक डॉ. दिलीप वांगे यांच्याकडे अपील केले. त्याच्या सुनावणीत व्यक्तिगत माहिती देता येत नाही. अध्यक्ष गुप्ता यांना विचारूनच माहिती देता येईल, असा पवित्रा वांगे यांनी घेतला. गुप्ता यांची प्रतिक्रिया ‘लोकमत’ने विचारली असता वांगे यांच्याकडून माहिती घेतो, एवढेच ते म्हणाले. वांगे प्रतिक्रियेस दूरध्वनीवर उपलब्धच होत नाहीत. (प्रतिनिधी)
बालाजी तांबे प्रकरणाची माहिती नाकारली
By admin | Published: October 13, 2016 6:34 AM