संगमनेर : ‘आयुर्वेदिय गर्भसंस्कार’ या पुस्तकातून पुत्र प्राप्तीचा कथित उपाय सूचवून लिंग निवडीस प्रतिबंधक असलेल्या कायद्याचा भंग केल्याप्रकरणी लेखक डॉ. बालाजी तांबे यांच्यासह पुस्तकाचे प्रकाशक अभिजित पवार व विक्रेते संदीप मुळे यांच्याविरुद्ध वैद्यकीय अधिकाऱ्याच्या फिर्यादीवरून येथील सत्र न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व लिंग निदान करणे हा कायद्याने गुन्हा आहे. लिंगभेदाविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्र सरकार ‘बेटी बचाव’अभियानाद्वारे देशभर जागृती करत आहेत. तांबे यांनी ‘आयुर्वेदिय गर्भसंस्कार’ या पुस्तकात पुत्र प्राप्तीबद्दल उपाय सूचवून कायद्याचा भंग केला असल्याची तक्रार ‘लेक लाडकी’ या अभियानाचे कार्यकर्ते गणेश बोऱ्हाडे यांनी नोव्हेंबर २०१५ मध्ये नगरच्या जिल्हा शल्य चिकित्सकांकडे केली होती. या अनुषंगाने जिल्हा शल्य चिकित्सकांनी संबंधितांकडून खुलासा मागविला. त्यानंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे हे प्रकरण सोपविण्यात आले. विद्यापीठाने पुस्तकाचा अभ्यास करून अहवाल देण्यासाठी समिती गठीत केली. (प्रतिनिधी)
बालाजी तांबे यांच्यासह तिघांवर गुन्हा; पुत्रप्राप्तीचा प्रचार
By admin | Published: June 16, 2016 1:51 AM