पुणे : पाठ्यपुस्तकांची निर्मिती करणाऱ्या बालभारतीमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मद्य पार्टी केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी अंतर्गत लेखा परीक्षक रामू कोळी या अधिकाऱ्याला तातडीने निलंबित करण्यात आले आहे. बालभारतीच्या स्थापनेला शुक्रवारी पन्नास वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त संस्थेच्या आवारात २३ जानेवारीपासूनच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तर मद्य पार्टीचा प्रकार २४ तारखेला सायंकाळी घडला आहे. त्यावेळी बालभारतीचे संचालक डॉ. सुनील मगर हे ‘सरल’ या संगणक प्रणालीचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी बाहेरगावी गेले होते. त्यांना याबाबत दुसऱ्या दिवशी माहिती मिळाली. मद्य पार्टी झाल्याचे मान्य करीत डॉ. मगर यांनी कोळी याचे निलंबन केल्याचे सांगितले. यामध्ये आणखी कोण अधिकारी व कर्मचारी सहभागी होते का, याबाबत चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ म्हणजे बालभारतीची स्थापना २७ जानेवारी १९६७ रोजी पुण्यात झाली. राज्यातील प्राथमिक स्तरावर शिक्षण घेणाऱ्या पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी भाषा व इतर सर्व विषयांची पाठ्यपुस्तके तयार करून वितरित करण्याचे काम हे मंडळाचे मुख्य उद्दिष्ट आहे. सध्या दरवर्षी सुमारे १५ कोटींहून अधिक पुस्तकांची छपाई व वितरण बालभारतीकडून केले जाते. गेल्या पन्नास वर्षाच्या काळात नवीन शैक्षणिक विचारप्रणाली, कालसुसंगत शैक्षणिक धोरणे, नवीन अध्ययन- अध्यापन पद्धती अशा विविध बाबींचा विचार करून पुस्तकांच्या स्वरूपात, आशयात अनेक बदल केले आहेत.
बालभारतीत रंगली मद्य पार्टी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2017 3:47 AM