बालाकोट एअर स्टाईकची चिकित्सा का आवश्यक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 04:06 PM2019-04-01T16:06:17+5:302019-04-01T16:19:33+5:30
पुलवामा हल्ल्यानंचर भारताने दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त करण्यासाठी बालाकोट येथे एअरस्ट्राईक केला. त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी या हल्ल्यात ३०० दहशतवादी मरण पावल्याचे घोषित केले. विरोधकांनी या मत दहशतवाद्यांच्या आकड्यावर शंका घेतली.. आणि एका नवीन राजकीय वादाला तोंड फुटले..खरंच बालाकोट एअर स्ट्राईकची चिकित्सा व्हायला हवी का ..?
- विवेक भुसे-
लोकसभा निवडणुकीच्या तयारीची पाहणी करण्यासाठी राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल हे पुण्यात आले होते़. त्याचवेळी नौदलाने दहशतवादी समुद्रामार्गे येण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला होता़. त्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जयस्वाल म्हणाले होते की, मुंबईवरील हल्ला आम्ही कधीही विचारु शकत नाही़.
मुंबईवर झालेला हल्ला हा केवळ पोलीसच नाही तर सरंक्षण दल, गुप्तचर संस्था, राजकीय पक्ष, देशभरातील सर्व राज्यातील सरकारे, केंद्र सरकार आणि सामान्य नागरिक यापैकी कोणीही विसरु नये़. पाकिस्तानातून आलेल्या ८ जणांनी संपूर्ण देशाला तीन दिवस वेठीस धरले होते़. याची पूनावृत्ती होऊ नये़. भविष्यात कोणत्याही दहशतवाद्याने भारताकडे वाकड्या नजरेने पाहून यासाठी भारताच्या हवाई दलाने बालाकोट येथील जैश ए महंमदच्या तळावर केलेल्या एअर स्टाईकची चिकित्सा करणे आवश्यक आहे़.
या एअर स्टाईकवरुन सत्ताधारी भाजप आणि विरोधक यांच्यात एकमेकांवर आरोपप्रत्यारोप सुरु झाले आहेत़. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तर आता एअर स्टाईकवरुन विरोधकांवर निशाणा साधताना जवानांच्या देशभक्तीवर सवाल करीत असल्याचे सांगत आहे़. निवडणुकीच्या या राजकारणात फायदा उठविण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे़ तर त्याचावर प्रश्न चिन्ह उभे करुन विरोधक लोकांना संभ्रमित करीत आहेत़. मात्र, त्याच्या पुढे जाऊन या एअर स्टाईकचा नेमका काय परिणाम झाला़ याचा भविष्याच्या दृष्टीने शोध घेण्याची नितांत आवश्यकता आहे़.
जैश ए महंमदच्या या प्रशिक्षण तळावर सुमारे ३०० तरुण प्रशिक्षण घेत असल्याचे व त्या सर्वांचा खातमा झाल्याचा दावा भाजप करीत आहे़. तसे जर असेल तर ते हवाई दलाचे सर्वात मोठे यश म्हणावे लागेल़. मात्र, त्याला पुष्ठी देणारे पुरावे अद्याप समोर आले नाहीत़. मोदी सरकारने प्रथमच पाकिस्तानची हवाई हद्दीचा भंग करुन कारवाई केली़. त्यावर कोणत्याही देशाने पाकिस्तानची बाजू घेतली नाही़.ही आपल्या दृष्टीने चांगली गोष्ट झाली़. मात्र, त्याचवेळी परदेशी मिडियाने हा हल्ला व त्याचा झालेला परिणाम यावर वेगवेगळी मते व्यक्त केली आहे़. अनेकांनी या हल्ल्यात जैश ए महंमदचे काहीही नुकसान झाले नसल्याचा दावा केला आहे़ तर बीबीसीने ६० जण ठार झाल्याचे म्हटले आहे़.
हे सर्व पहाता भारतीय गुप्तचरांनी आतापर्यंत या घटनेचा सर्व धुंडोळा घेतला असण्याची शक्यता आहे़ हवाई दलाला सोपविलेले काम त्यांनी केले़. त्यातून जैश ए महंमदच्या कँपचे किती नुकसान झाले, हे पाहणे व त्याची खात्री करणे गुप्तचर एजन्सीचे काम आहे़. त्याचवेळी हल्ल्यानंतर आपणच आपली पाठ थोपटून घेऊन निर्धास्त बसणेही चुक ठरु शकते़.
जर या हल्ल्यात हा संपूर्ण कँप उद्धवस्त झाला नसेल तर तो भारतासाठी पुढील काळात खूप मोठा धोका ठरु शकतो़.
मुंबईत केवळ ८ जण आले व त्यांनी देशाला वेठीस धरले होते़. आता बालाकोटला जैश ए महमंदच्या कँपवर ३०० जण प्रशिक्षण घेत होते़ (हल्ला करण्यात आला .तेव्हा तेथे ३०० मोबाईल अॅक्टिव्ह असल्याचे सांगितले जाते) त्यापैकी किती जण या हल्ल्यात मारले गेले़. त्यांचा कँप पूर्णपणे उद्धवस्त झाला का ? जर झाला अथवा नाही तरी आता ते पुढे काय करीत आहेत़ याची माहिती काढणे अत्यंत आवश्यक आहे़.
जर या कँम्पचे फारसे नुकसान झाले नसेल व प्रशिक्षण घेणारे अनेक जण वाचले असतील तर ते भारतासाठी सर्वात धोकादाय ठरु शकते़. या हल्ल्यातून वाचलेले दहशतवादी अधिक पेटून उठतील व पुढील काळात ते एकत्रितपणे भारताला लक्ष्य करण्याची सर्वाधिक शक्यता आहे़.
एका आत्मघातकी दहशतवाद्याने किती हाहाकार माजविला हे आपण पुलवामा घटनेत पाहिले आहे़. या कँपवर तर शेकडोने आत्मघातकी पथक तयार करण्याचे काम सुरु होते, असे सांगितले जाते़. ते पाहता भविष्यात जर मुंबईत ते जसे आले तसे त्यांनी एकाचवेळी देशाच्या वेगवेगळ्या भागात जाऊन आत्मघातकी हल्ले केले तर देशात काय परिस्थिती निर्माण होऊ शकेल, याचा विचारही आपण सध्या करु शकत नाही़. त्यामुळे राजकीय नेते काय बोलतात, याकडे दुर्लक्ष करुन बालाकोट एअर स्टाईकच्या परिणामाची चिकित्सा होणे भविष्यासाठी अत्यंत आवश्यक आहे़ .