संदीप आडनाईक / कोल्हापूरदोन वर्षांपासून बंद असलेला ‘चाचा नेहरू बालमहोत्सव’ यंदा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला किमान सव्वा लाख रुपयाचा निधी मंजूर केला असून, तशी आर्थिक तरतूदही केली आहे. बालगृहातील मुला-मुलींसाठी यंदा राज्य सरकारने ही बालदिनानिमित्त आनंदाची भेट दिली आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त तत्कालीन आघाडी सरकारने २0१२पासून बालगृहातील मुला-मुलींसाठी ‘चाचा नेहरू बालमहोत्सव’ सुरू केला होता. हा सोहळा म्हणजे खेळ, करमणूक आणि व्यक्तिमत्त्व विकासाची एक पर्वणीच होती. मात्र, आर्थिक तरतुदीअभावी २0१४ पासून विद्यमान सरकारने तो बंद केला होता. कोल्हापुरातील ‘आभास फाउंडेशन’ या संस्थेने गेली दोन वर्षे सातत्याने याबाबत पाठपुरावा केला. ३६ जिल्ह्यांतील बालमहोत्सवासाठी ४0 लाख ७0 हजार २00 रुपयांचा निधी मंजूर केला आहे, तशी तरतूदही केली आहे. राज्यात ९९४ बालगृहे व ६0 निरीक्षण गृहामध्ये ९0 हजार मुले आहेत. त्यांना त्याचा लाभ होईल.पाच लाखांचा निधी सव्वा लाखांवर२0१२ मध्ये महिला व बाल विकास विभागाने ही योजना सुरू करताना प्रत्येक जिल्ह्यासाठी पाच लाख रुपयांची तरतूद केली होती. २0१२ आणि २0१३ या दोन वर्षांत बालमहोत्सवावर हा निधी खर्चही झाला होता, परंतु नवीन सरकारने सत्तेवर येताच २0१४ पासून आर्थिक तरतूद नसल्याचे कारण देत, महोत्सवच बंद केला होता. यंदा मात्र, पाच लाख रुपयांच्या अनुदानात कपात करून, अवघ्या सव्वा लाख रुपयांवर बोळवण करण्यात आली आहे. महोत्सव नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होतो.
बालमहोत्सव सुरू
By admin | Published: November 14, 2016 4:55 AM