नारायण राणे यांची टीका : सत्तेसाठी मुख्यमंत्र्यांचीही तडजोडमुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जे कमावले ते उद्धव ठाकरे यांनी स्मारकासाठी महापौर बंगला मिळवून घालवले. बंगला मिळताच मुख्यमंत्र्यांना वाकून नमस्कारही केला, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी केली.ते म्हणाले, सीआरझेड कायद्यामुळे समुद्रापासून ५०० मीटरच्या आत बांधकाम करता येत नाही. महापौर बंगला हा ५०० मीटरच्या आत आहे. महापालिकेचा कसलाही प्रस्ताव नाही. शिवाय, कॅबिनेटमध्ये ठराव नसताना केवळ शिवसेना सत्तेतून बाहेर पडू नये म्हणून तडजोड करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापौर बंगला शिवसेनेला देण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप राणे यांनी केला. बाळासाहेबांचे स्मारक दादर भागात झाले पाहिजे, अशी आपली इच्छा आहे. पण मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यात समझौता झाला आहे. कल्याण डोंबिवलीत शिवसेना एकट्याच्या बळावर महापौर बनवू शकत होती, एकनाथ शिंदे यांनी सगळी तयारी केली होती, मनसे बाहेरून पाठिंबा देणार होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष करत महापौर बंगल्याच्या नावावर तडजोड केली गेली, असा गौप्यस्फोटही राणे यांनी केला. कोणताही ट्रस्ट स्थापन करताना चार लोक एकत्र येऊन अध्यक्षाची निवड करतात. मात्र येथे कोणी एकत्र आले नाही. कसली बैठक झाली नाही. मुख्यमंत्री येऊन उद्धव ठाकरे ट्रस्टचे अध्यक्ष होतील असे जाहीर करतात, आदित्यचेही नाव त्यात असेल असे सांगतात, एवढे आहे तर फॅमिली ट्रस्ट करून टाका, असा टोला राणे यांनी लगावला. (विशेष प्रतिनिधी)
बाळासाहेबांनी कमावले, उद्धवनी घालविले
By admin | Published: November 20, 2015 1:37 AM