बाळासाहेबांनी काँग्रेसचा तिरस्कार केला नाही; संजय राऊत यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 01:07 PM2024-11-18T13:07:30+5:302024-11-18T13:08:27+5:30
बॅरिस्टर अंतुले, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील यांच्यासह शरद पवार यांच्याशीही बाळासाहेबांचे जिव्हाळ्याचे संबंध होते, असे राऊत म्हणाले.
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसचा कधीच तिरस्कार केला नाही. काँग्रेसमधील अनेक नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध होते. इंदिरा गांधींपासून ते राजीव गांधींपर्यंत त्यांनी देशाच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी नेहमीच पाठिंबा दिला होता, असा दावा खा. संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
बॅरिस्टर अंतुले, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील यांच्यासह शरद पवार यांच्याशीही बाळासाहेबांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. महाराष्ट्राच्या विकासासाठी बाळासाहेबांनी नेहमीच काँग्रेस नेत्यांना पाठिंबा दिला होता; पण काहींनी टेंभी नाक्याच्या बाहेरचे जग पाहिले नसल्याने त्यांना त्याबद्दल माहिती नाही, असा टोला राऊत यांनी लगावला.
मुंबईला राज्यापासून तोडण्याचा डाव
नवी मुंबई : देशात ठरावीक उद्योजकांना पायघड्या घातल्या जात आहेत. मुंबई अदानीला, तर नवी मुंबई अंबानीला दिली जात आहे. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचे, केंद्रशासित प्रदेश करण्याचे षडयंत्र आहे, असा आरोप खा. संजय राऊत यांनी कोपरखैरणे येथे ऐरोली मतदारसंघातील उद्धवसेनेचे उमेदवार एम. के. मढवी यांच्या प्रचारसभेत केला.
ही निवडणूक फक्त एका उमेदवाराची नाही तर राज्याची अस्मिता वाचविण्याची आहे. ऐरोलीतील आमदाराने वर्षानुवर्षे सत्ता उपभोगली. आमदार म्हणून कोणता प्रकल्प आणला ते सांगावे, असे आव्हानही त्यांनी दिले.