रत्नागिरी: एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यापासून उद्धव ठाकरेंच्या गटातील नेते सातत्याने त्यांच्यावर टीका करत आहेत. यातच शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनीही शिंदेंवर निशाणा साधला. 'एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना माझ्यामुळे आमदारकीचं तिकीट मिळालं. पण, आज त्याचा पश्चाताप होतोय,' असे राऊत म्हणाले.
'शिंदेंनी आई-वडिलांची शपथ घ्यावी'
रत्नागिरीत माध्यमांशी बोलताना राऊत यांनी एकनाथ शिंदेंच्या पहिल्या आमदारकीचा एक किस्सा सांगितला. ते म्हणाले की, 'माझ्या आयुष्यातील हे मोठ पाप झाले. मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (balasaheb thackeray) यांना सांगितले नसते तर एकनाथ शिंदेंना आमदारकी मिळाली नसती. शिंदे सभागृह नेते होते आणि मी संपर्कप्रमुख होतो. बाळासाहेब ठाकरेंनी सतीश प्रधान यांना एबी अर्ज दिला. पण, मी बाळासाहेबांना विनंती केली आणि त्यानंतर बाळासाहेबांनी एकनाथ शिंदेंना उमेदवारी दिली. ही गोष्ट खरी आहे का नाही ते एकनाथ शिंदेंनी त्यांच्या आई-वडीलांची शपथ घेऊन सांगावे,' असेही राऊत म्हणाले.
एकनाथ शिंदेंना टोलायावेळी माध्यम प्रतिनिधींनी राऊत यांना शिंदेंनी ठाकरेंवर केलेल्या टिकेविषयी विचारले. 'रिक्षाच्या स्पीड पेक्षा मर्सिडीजचा स्पीड फिका पडला', असे एकनाथ शिंदे म्हणाले होते. त्यावर बोलताना विनायक राऊत म्हाले की, 'एकनाथ शिंदे यांच्या विद्वत्तेबद्दल संशोधन करावं लागेल. कुणीतरी लिहून देतं म्हणून ते ट्विट करतात. स्वतः कधी ट्विट करतात हा अभ्यास करावा लागेल', असा टोला राऊतांनी लगावला.