पुणे : बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनात मैत्रीला, दिलेल्या शब्दाला फार महत्त्व होते, त्यासाठी प्रसंगी ते स्वत:चे, पक्षाचे नुकसानही सहन करीत. शब्द दिला म्हणून सार्वत्रिक निवडणुकीत एकही उमेदवार उभा न करणारे बाळासाहेब हे एकमेव राजकीय नेते असतील, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या आपल्या मैत्रीला उजाळा दिला. महापालिकेने सारसबागेसमोर तयार केलेल्या बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्र कलादालनाचे उद््घाटन शुक्रवारी सकाळी पवार यांच्या हस्ते झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रमुख पाहुणे होते. पालकमंत्री गिरीश बापट, महापौर प्रशांत जगताप, खासदार शिवाजीराव आढळराव, श्रीरंग बारणे, वंदना चव्हाण, संजय राऊत, आमदार नीलम गोऱ्हे, विजय चौगुले आदी या वेळी उपस्थित होते.पवार यांनी बाळासाहेबांसोबतच्या मैत्रीचे अनेक किस्से सांगितले. ते म्हणाले, ‘‘सुप्रियाच्या राज्यसभेच्या उमेदवारीच्या वेळी मी बाळासाहेबांना विचारले, तुमचा उमेदवार कोण? तर ते चिडले, अंगाखांद्यावर खेळलेल्या मुलीच्या विरोधात उमेदवार द्यायचा का? असे म्हणाले व सुप्रियाची पहिलीच निवडणूक बिनविरोध केली.’’ कुंचल्याने माझ्या वाढलेल्या वजनावर त्यांनी अनेक वार केले, मात्र मैत्रीत त्याचा दुरावा कधीच येऊ दिला नाही. दिलखुलास असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य दिले. व्यंगचित्रकार म्हणून त्यांचे स्थान अजोड होते. ते जपण्याचा प्रयत्न महापालिकेने कलादालन उभारून केला, हे स्तुत्य आहे, असे पवार म्हणाले. उद्धव ठाकरे यांनीही महाराष्ट्रात प्रथमच असे दालन तयार झाल्याबद्दल कौतुक केले. मी बाळासाहेबांचा वारसा जपण्याचा प्रयत्न करीत आहे. मी सरकारमध्ये राहून विरोध करतो अशी टीका होत असते, पण बाळासाहेबांनी दिलेल्या ठिणग्या आहेत, त्या उडणारच असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)च्पुणे : उत्तराखंड प्रकरणात राष्ट्रपतींची विनाकारण बदनामी झाली, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर टीका केली. च्राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या निर्णयाला न्यायालयाने फटकारल्यानंतर आता मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनेही केंद्र सरकारवर, पर्यायाने भारतीय जनता पक्षावर निशाणा साधत खडे बोल भाजपाला सुनावले. ठाकरे म्हणाले, की चांगली कामे असली तर लोक स्वत:हून सत्ता देतात, तिथे घाई कामाची नाही. हे प्रकरण न्यायालयाचा अवमान, राष्ट्रपतींचा अवमान इतक्यापुरतेच मर्यादित नाही; त्याकडे गंभीरपणे पाहायला हवे. न्यायालयाचा निकाल आता आला आहे व त्यातून अनेक गोष्टी सुचित होत आहेत. त्या जगाला समजल्या. आपल्या राष्ट्रपतींचा आपणच वापर करतो आहोत, असे जगाला समजणे चुकीचे आहे.च्केंद्र सरकारने यात विनाकारण घाई केली. सत्ता हवीच असेल तर त्यासाठी चांगली कामे करायला हवीत, त्यातून लोक आपोआप सत्ता देतील. मात्र सत्तेसाठी अशी घाई करणे योग्य नाही. आपण काय करतो आहोत, त्याचे परिणाम काय होतील याचे भान तरी ठेवलेच पाहिजे अन्यथा असा प्रकार होतो, असे ठाकरे म्हणाले.
बाळासाहेब म्हणजे मैत्रीला जागणारा नेता!
By admin | Published: April 23, 2016 3:57 AM