संदीप प्रधान, मुंबईलोणावळा येथील वॅक्स म्युझियमसाठी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा दोन वर्षांपूर्वी तयार करण्यात आला खरा; परंतु शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पुतळ्याच्या अनावरणाकरिता तारीख देत नसल्याने बाळासाहेबांच्या पुतळ्यावर पडदानशीन अवस्थेत राहण्याची वेळ आली आहे! विशेष म्हणजे, शिवसेनाप्रमुखांच्या स्नुषा स्मिता ठाकरे यांच्या विनंतीवरून सुप्रसिद्ध मूर्तिकार सुनील कंडलूर यांनी हा पुतळा तयार केला आहे. या वॅक्स म्युझियममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक मान्यवरांचे मेणाचे पुतळे आहेत. लंडनमधील वॅक्स मुझियमच्या धर्तीवर हे म्युझियम आहे. बाळासाहेबांचा पुतळा तयार करण्याकरिता त्यांच्या अंगाची मापे घेण्याची विनंती कंडलूर यांनी केली होती. मात्र त्या वेळी त्यांची प्रकृती ठीक नसल्याने तशी परवानगी दिली गेली नव्हती. बाळासाहेबांच्या निधनानंतर दोन-तीन महिन्यांनी स्मिता ठाकरे यांनी कंडलूर यांची भेट घेऊन त्यांच्या बिझनेस सेंटरमध्ये ठेवण्याकरिता सेनाप्रमुखांचा पुतळा तयार करण्याची विनंती केली.कंडलूर यांनी पुतळा तयार झाल्यावर अनावरणासाठी उद्धव यांच्याशी वारंवार संपर्क साधला. परंतु त्यांनी होकार अथवा नकार कळवला नाही. त्यामुळे बाळासाहेबांचा पुतळा गेली दोन वर्षे कंडलूर यांच्या वर्कशॉपमध्ये ठेवलेला आहे.
बाळासाहेबांचा पुतळा उद्धवच्या प्रतीक्षेत
By admin | Published: August 03, 2015 2:27 AM