मुंबई: आज शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे(Balasaheb Thackeray ) यांची जयंती आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी बोलताना राऊत यांनी विरोधकांवर जहरी टीका केली. आज बाळासाहेब असते तर विरोधकांची कावकाव, फडफड आणि तडफड थांबली असती. आज जे काही घडताहे, ते बाळासाहेबांच्या प्रेरणेतूनच घडतंय, असं राऊत म्हणाले.
'बाळासाहेबांचा शब्द म्हणजे धनुष्यातून सुटलेला बाण' संजय राऊत मीडियाशी संवाद साधत असताना बाळासाहेब ठाकरे असते तर काय परिस्थिती असती? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना राऊतांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. आज बाळासाहेब असते तर बऱ्याच गोष्टी झाल्या नसत्या आणि नव्याने काही घडल्या असत्या. आता सध्या भाजपची जी चिवचिव सुरू आहे, फडफड सुरू आहे ती बाळासाहेबांच्या अस्तित्वानेच थंड पडली असती. बाळासाहेबांचा स्वभाव हा सौ सोनार की एक लोहरकी असा होता. बाळासाहेबांचा शब्द म्हणजे धनुष्यातून सुटलेला बाण होता, असं राऊत म्हणाले.
'...तर त्यांनी विरोधकांना फटकारे नक्कीच माराले असते'बाळासाहेबांनी कुंचला हाती ठेवला तेव्हा त्यांच्या हाताला त्रास व्हायचा. एकेकाळी मी कुंचला हाती घेतला की अनेकजण थरथरायचे. आज माझे हात थरथर थरत आहेत. प्रेरणा देणारे मॉडल्स मला आता दिसत नाहीत असं ते म्हणायचे. चर्चिल, नेहरू, जॉर्ज फर्नांडिस, सरदार पटेल, इंदिरा गांधी, गुलजारीलाल नंदा, मोरारजी देसाई, एसके पाटील ही सर्व मोठी माणसे गेल्यानंतर एक पोकळी निर्माण झाली. त्यामुळे बाळासाहेबांना चित्रं काढायला त्यांच्याकडे मॉडल्स नव्हती. आज मोदी आहेत, अमित शहा आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत. आता राज्यात आणि देशात गडबड सुरू आहे, बाळासाहेब असते तर त्यांना कुंचला हातात घेऊन स्ट्रोक्स, फटकारे नक्कीच मारावेसे वाटले असते, असं राऊत म्हणाले.
'बाळासाहेबांचे विचार अजूनही कायम'राऊत पुढे म्हणाले की, महाराष्ट्राची अस्मिता, मराठी माणसाला स्वाभिमान आणि अन्यायाविरोधात लढण्याचे बळ बाळासाहेबांनी दिले. देशाला तुम्ही हिंदू आहात आणि हा देश हिंदुंचा आहे ही ओळख प्राप्त करुन दिली. आज कोणी काही म्हणू द्या, गर्व से कहो हम हिंदू है, मराठी आहोत हा आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम त्यांनी केले. बाळासाहेबांनी महाराष्ट्र आणि देशाला केवळ राजकीय दिशा दिली असे नाही, अनेक गोष्टी दिल्या. ते होते तोपर्यंत कुणाचीही पोपटपंची चालली नाही. अर्थात आताही चालणार नाही कारण अजूनही बाळासाहेबांचा विचार कायम आहेत, असं त्यांनी सांगितलं.