नीलम गोऱ्हे, उपसभापती, विधान परिषद -
बाळासाहेब ठाकरे यांचा माझा परिचय झाला तो उद्धव ठाकरे यांच्यामुळे. कारण त्यांनी माझ्या शिवसेना पक्ष प्रवेशासाठी चांगला पुढाकार घेतला होता. याबाबत माझा संवाद बाळासाहेबांच्या सोबत झाला. नंतर अनेक वेळेला बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटीची संधी मिळाली.उद्धव ठाकरे यांच्यावरती शिवसेनेचे कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी पडल्यावर तर त्यांचे दौरे महाराष्ट्रभर होत असत. अशा दौऱ्यानंतर काही वेळेस बाळासाहेब ठाकरे मला भेटले की, त्यांना मी एखादे निवेदन वा पुस्तक द्यायचे, कामाची माहिती सांगायचे त्यावेळेस ते अगदी खूप बारीक चौकशी करत असत. त्यावेळी ते म्हणायचे की तू जळगावला गेलीस कशी, तू रस्त्याने गेलीस की रेल्वेने? मग तेथे गेल्यावर तुमची राहण्याची व्यवस्था असते का? तेथून परत येताना पुढच्या दौऱ्याला नांदेडला किती वेळात पोचलीस? मला खूप आश्चर्य वाटायचे की, बाळासाहेब एवढे कसे काय तपशीलवार चौकशी करतात? नंतर माझ्या हळूहळू लक्षात आले की, त्यांना काळजी असायची की, एक महिला एवढ्या ठिकाणी जाते म्हटल्यावर सहकार्य सर्व ठिकाणी मिळते की नाही? याचा ते मागोवा घ्यायचे.राज्यात संपर्कप्रमुख असताना पुणे जिल्ह्याची पूर्ण जबाबदारी माझ्यावर टाकली गेली. त्या अगोदर मला बाळासाहेब म्हणाले होते, की तू एवढे काम करतेस मग हेच काम संघटनेसाठी उपयोगी ठरेल. मला विशेष वाटते की त्या काळात सगळे जे काही काम झाले त्याच्यात बाळासाहेबांचे मार्गदर्शन प्रत्येक पावली मिळाले. संपर्कप्रमुख पदानंतर माझी संघटनेची स्वतःची जाण चांगल्या प्रकारे वाढली. शिवसैनिकांचे मन काय आहे, अंतरंग काय आहे, याचा दुवा म्हणून मला त्या कामाचा खूप फायदा झाला.
कामाची दिशा मिळाली -काही वेळा, निवडणुकीच्या दौऱ्यामध्ये मला फोन आला होता की, त्या जिल्ह्यात कशी परिस्थिती आहे? माझ्याकडे अमुक अमुक रिपोर्ट आला होता. या जिल्ह्यात तुझे काय निरीक्षण आहे? अशा बारीक बारीक चौकशीतूनसुद्धा खूप हुरूप वाटायचा. उद्धवना एखादी गोष्ट कळवली ती त्यांनी बाळासाहेबांच्या कानावर घातलेली असायची आणि प्रश्न सोडविताना आपण कसे काम करायला पाहिजे याची दिशा मला मिळायची.