ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 7 - हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक सुधारणा विधेयकाला विधानसभेत मंजुरी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे आणि भाजपानं या विधेयकाला एकमतानं पाठिंबा दिला आहे. मात्र शिवसेना मंत्री आणि आमदार उपस्थित नसताना हे विधेयक मंजूर करण्यात आल्यानं राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय ठरला आहे. बाळासाहेब ठाकरे स्मारक सुधारणा विधेयक मंजूर झाल्यानं महापौर बंगल्याचा भूखंड स्मारक समितीला हस्तांतरित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीला 30 वर्षांच्या कालावधीसाठी प्रतिवर्ष एक रुपया भाड्यानं हा भूखंड देण्यात येणार आहे.हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी महापौर बंगल्याची जागा देण्यासाठी नगरविकास खात्यानं आधीच मान्यता दिली आहे. तसेच त्याबाबतची अधिसूचनाही काढली होती, मात्र महापौर बंगल्याची जागा पालिकेच्या मालकीची असल्यामुळे ती स्मारक समितीला हस्तांतरित करण्यासाठी सुधार समितीच्या आणि सभागृहाच्या मंजुरीची गरज लागणार होती. त्यामुळे महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधी सुधार समितीने तातडीने विशेष बैठक बोलावून याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती.मात्र ऐन वेळी आचारसंहिता लागू झाल्यामुळे हा प्रस्ताव पालिका सभागृहात बारगळला होता. अखेर आचारसंहिता संपल्यानंतर सभागृहात याबाबतचा प्रस्ताव मांडण्यात आला आणि त्याला बिनविरोध मंजुरी देण्यात आली. त्याप्रमाणेच आता विधानसभेतही हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक सुधारणा विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. विधेयकाच्या मंजुरीनंतर दादरमधील महापौर निवासस्थान परिसरातील शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचा मार्ग मोकळा झाला आहे.
Maharashtra assembly unanimously passes a bill for Bal Thackeray Memorial in Dadar. pic.twitter.com/q2GxuFYHNl— ANI (@ANI_news) March 7, 2017