आमदार अपात्रतेवरील सुनावणीचा आजचा दिवस शिवसेनेतील वर्चस्वाच्या राजकारणात वादळी ठरण्याची शक्यता आहे. बाळासाहेब ठाकरे हे मनमानी करत होते असा गंभीर आरोप २०१४ मध्ये राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांनी केला होता. आता खासदार राहुल शेवाळे यांनी बाळासाहेबांनी पक्षाची घटना पाळली नसल्याचा दावा फेरसाक्ष नोंदविताना केला आहे.
"बाळासाहेब मनमानी करत होते, शिंदेंच्या आमदारांची साक्ष"; ठाकरेंच्या शिवसेनेचा गौप्यस्फोट
उद्धव ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांची फेरसाक्ष नोंदविली. यावेळी घटना पाळली न गेल्याने जुलै २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांची मुख्य नेतापदी निवड केल्याची घटनादुरुस्ती करण्यात आल्याचा दावा शेवाळे यांनी केला आहे.
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार बाळासाहेबांनी १९९९ ला पक्षाची घटना बनविली होती. परंतु ती नियमानुसार पाळली गेली नाही. घटनेनुसारच राष्ट्रीय कार्यकारिणी आणि प्रतिनिधी सभेच्या बैठका घ्यायला हव्या होत्या. मात्र, दुर्दैवाने या बैठका झाल्या नाहीत, तसेच पक्षांतर्गत कोणत्या निवडणुकाही झाल्या नाहीत, असा दावा शेवाळे यांनी केला. यावर वकिलांनी तुम्ही बाळासाहेब ठाकरेंवर गंभीर आरोप करत आहात असे विचारताच शेवाळे यांनी नाही असे उत्तर दिले.
तसेच पक्षाच्या घटनेत २०१८ साली पक्षाच्या घटनेत दुरुस्ती झाल्याचे तुम्हाला कधी कळाले, असे विचारले असता शेवाळे यांनी माहिती नाही असे उत्तर दिले. युवासेना प्रमुखपद माहिती आहे. पण घटनेतील तरतूद माहिती नाही. १९९९ च्या घटनेत २०२२ मध्ये दुरुस्ती झाली, असा दावा शेवाळे यांनी केला.
शेवाळे यांनी आपल्याला ट्विटर युजरनेम आठवत नसल्याचे सांगितले. २३ जानेवारी २०१८ साली आदित्य ठाकरे यांची युवासेना प्रमुखपदी प्रतिनिधी सभेत निवड झाली हे खरे नाही, आदित्यना ट्विटरवर शुभेच्छाही दिल्या नाहीत, असाही दावा शेवाळे यांनी केला. परंतु, वकिलांनी तुम्ही ट्विटरवर आदित्य यांना शुभेच्छा दिल्याचे म्हटले. तसेच शेवाळे यांचे ट्विटही दाखविले. यावर शेवाळे यांनी मला आठवत नसल्याचे म्हटले.