मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे राजाराम रेगे यांच्याद्वारे मन वळवून अमेरिकेत बोलवण्याचा कट लष्कर-ए-तोयबाचा (एलईटी) होता, अशी खळबळजनक साक्ष हेडलीने शनिवारच्या साक्षीदरम्यान विशेष न्यायालयाला दिली. बाळासाहेब ठाकरे व त्यांचा मुलगा अमेरिकेत आल्यानंतर त्यांची ‘काळजी’ अमेरिकेतील डॉ. तहव्वूर राणा आणि एलईटीचे अन्य सदस्य घेणार होते, अशीही माहिती हेडलीने न्यायालयाला दिली. यानंतर सरकारी वकिलांचे हेडलीची साक्ष नोंदवण्याचे काम पूर्ण झाले. आता त्याची उलटतपासणी घेण्यात येणार आहे. अमेरिकेतील अज्ञात स्थळावरून डेव्हिड हेडलीला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मुंबईच्या विशेष मोक्का न्यायालयाचे न्या. जी. ए. सानप यांच्यापुढे हजर करण्यात आले. या वेळी विशेष सरकारी वकील अॅड. निकम यांनी उद्धव ठाकरे यांचे पब्लिक रिलेशन अधिकारी राजाराम रेगे यांनी १९ मे २००८ रोजी पाठवलेल्या ई-मेलविषयी विचारणा केली. त्या वेळी हेडलीने रेगे यांचा वापर बाळासाहेब ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी करण्यात येणार होता, असे न्यालालयाला सांगितले.‘रेगे यांनी १९ मे २००८ रोजी मला मेल केला होता. त्यानंतर त्यांनी मला मोबाईलवर एक मॅसेजही केला. या मॅसेजमध्ये त्यांनी मला कॉल करण्यास सांगितले होते. त्यामुळे मी त्यांनी पाठवलेला मेल साजिद मीर, डॉ. राणा, पाशा आणि इक्बाल यांना पाठवून त्यांच्याकडून तातडीने सूचना मागवल्या. त्यावर मला वेगवगेळ्या सूचना मिळाल्या. पाशा आणि मीरला शिवसेना भवनावर हल्ला हवा होता. डॉ. राणाला पैसे कमवायचे होते तर मेजर इक्बालला माझी ओळख लपवायची होती. त्याचबरोबर रेगेंकडून भारतीय लष्कराची माहितीही मिळवायची होती,’ असे हेडलीने साक्षीत सांगितले.‘मेजर इक्बालने रेंगेच्या बाबतीत काही प्रश्न उपस्थित केले. त्यापैकी एक असा होता की, रेगे भारतीय लष्कराची व निमलष्करी दलाची माहिती देऊ शकतील का? असा होता. मी रेगेंशी संबंध तोडू नयेत. त्यांना सेमिनार आणि कॉन्फरन्समध्ये व्यस्त ठेवण्यास मेजर इक्बालने सांगितले. तसेच रेगे यांना आग्रह करून ‘बाळ आणि मुलगा’ (बाळसाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे) यांचे मन वळवून अमेरिकेत आणण्यास मेजर इक्बालने मला सांगितले होते. ते इथे आल्यावर डॉ. राणा आणि एलईटीचे अन्य सदस्य त्यांची ‘काळजी’ घेतील, असेही मेजर इक्बाल यांनी मला सांगितले’ अशीही साक्ष हेडलीने दिली.शनिवारी सरकारी वकिलांनी साक्ष नोंदवण्याचे काम पूर्ण केले. हेडलीला २६/११ हल्ल्याचा हॅन्डलर आणि मुंबईत आलेल्या दहा अतिरेक्यांना हिंदी शिकवणारा व सूचना देणारा अबु जुंदाल याच्या खटल्यात साक्षीदार म्हणून बोलवले आहे. त्यामुळे जुंदालचे वकील आता हेडलीची उलटतपासणी घेतील. जुंदालचे वकील २२ फेब्रुवारी रोजी हेडलीची उलटतपासणी कधी व किती वेळ घेणार आहे, याची तपशिलवार माहिती न्यायालयाला देतील. त्यानंतरच हेडलीची उलटतपासणी घेण्याची तारीख निश्चित करण्यात येईल. (प्रतिनिधी)