मुंबई - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी देश सज्ज झालेला असतानाच रुग्णांची संख्याही दिवसागणिक वाढत आहे. देशात कोरोनाचे जवळपास आठ लाख रुग्ण आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. याच दरम्यान लॉकडाऊनच्या दोन महिन्यांत बाळासाहेबांची आठवण आल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. (Sharad Pawar Sanjay Raut Interview)
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी शरद पवारांना 'या सर्व परिस्थितीत कधी बाळासाहेब ठाकरेंची आठवण येते का?' असा प्रश्न विचारला असता त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. लॉकडाऊनच्या काळात विशेषत: पहिले दोन महिने बाळासाहेब ठाकरेंची आठवण आल्याचं म्हटलं आहे. "बाळासाहेबांची कामाची पद्धत तुम्हाला माहीत आहे. बाळासाहेबांनी देखील काही दिवस घरात घालवले मात्र ते घालवत असताना सहकाऱ्यांना बरोबर ठेवून त्यांना प्रोत्साहित करून परिस्थितीला कसं तोंड द्यायचं हे बाळासाहेबांनी नक्कीच शिकवलेलं होतं" असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
"लॉकडाऊनच्या काळात माझ्यासारख्याला या दोन महिन्यांत बाळासाहेबांची आठवण यासाठी होती की आपण घराच्या बाहेर तर पडायचं नाही मात्र ज्या दिशेने आपल्याला जायचंय त्या दिशेने जायच्या प्रवासाची तयारी केली पाहिजे आणि ते बाळासाहेब करायचे त्यामुळे त्याची आठवण या काळात अधिक झाली" असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन करावा लागला. केंद्रीय पातळीवर लॉकडाऊनचा निर्णय होण्याआधी महाराष्ट्रात लॉकडाऊनची घोषणा झाली. मात्र या लॉकडाऊनबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा होत्या. मात्र आमची भूमिका वेगळी नाही. आमच्यामध्ये मतभेद नाहीत, असं शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावासंदर्भात शरद पवारांना विचारले असता ते म्हणाले, इथून पुढे प्रत्येक नागरिकाला तुम्हाला आणि मला कोरोनासह जगायच्या संबंधीची तयारी असली पाहिजे. त्यामुळे कोरोना हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग होतोय, अशी भूमिका तज्ज्ञांकडून मांडली गेली आहे. ती गृहीत धरून पुढे जाण्याच्या संबंधीचा विचार करावा लागेल. जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून कोरोनाचा ट्रेंड खाली जाईल. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये तो नॉर्मलवरती येईल, पण याचा अर्थ तो कायमचाच संपला असा घेण्याचं कारण नाही. तो रिव्हर्सही होऊ शकतो. त्यामुळे या सगळ्या काळात आपल्याला कोरोनाची काळजी घ्यावी लागेल, असंही शरद पवारांनी संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.