सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने आज निवडणूक आयोगाला शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण कोणाचा यावर कार्यवाही घेण्यास हिरवा कंदील दिला आहे. असे असताना हा उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. ठाकरे गट हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे न जाण्यासाठी प्रयत्न करत होता. तर शिंदे गट यासाठी आग्रही होता. यातच आता शिंदे गटाची बाजू लढविण्य़ासाठी बाळासाहेब ठाकरेंच्याच नातवाने रसद पुरविली आहे.
बाळासाहेब ठाकरेंचे ज्येष्ठ सुपूत्र दिवंगत बिंदू माधव ठाकरे यांचे पूत्र निहार ठाकरे हे सर्वोच्च न्यायालयात वकील आहेत. याहून मोठा ट्विस्ट म्हणजे ते शिंदे गटाच्या वकिलांच्या पॅनलमध्ये आहेत. आजच्या निर्णयावर निहार ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदेंना भेटलेलो तेव्हा त्यांना म्हणालेलो की ते बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन चालले आहेत. त्यामुळे त्यांना पाठिंबा आहे, असे निहार यांनी स्पष्ट केले.
शिंदेंच्या बाजुने आम्ही आमची बाजू मांडली. न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या कामकाजाला परवानगी दिली आहे. आयोगाकडील लढाई आम्ही नक्कीच जिंकू. आमच्याकडे बहुमत आहे. जवळपास ८० टक्के आमदार, खासदार आणि पक्षाचे पदाधिकारी आमच्याकडे आहेत. कोणाला मुदत द्यायची की नाही हे आता निवडणूक आयोग ठरवेल. त्यांना आणखी मुदत मिळेल असे वाटत नाही, त्यांनी एवढ्यात सर्व दाखल करायला हवे होते. आम्ही दीड लाख अफिटेव्हिट आयोगाकडे दिली आहेत, असे निहार ठाकरे यांनी स्पष्ट केले.
Eknath Shinde : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
धनुष्यबाण कोणाला मिळेल यावर, ज्या गटाकडे मेज़ॉरिटी सपोर्ट असतो त्य़ाच गटाचा पक्ष मानला जातो. निवडणूक आयोगाची तारीख जाहीर होण्यासाठी लवकरच पत्र लिहिणार आहोत. तसेच मी राजकारणात येण्याचा विचार केलेला नाही. शिंदेंना जे काही कायदेशीर पाठिंबा लागेल तो देणार, असे निहार ठाकरे म्हणाले.