मुंबई - स्वबळाच्या घोषणा, एकमेकांना उचलून आपटण्याची दिलेली आव्हाने असे अनेक चढउतार पाहिल्यानंतर शिवसेना आणि भाजपामधील युतीचे सूर अखेर जुळले आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्यानंतर आज दोन्ही पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. दरम्यान, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दादर येथील प्रस्तावित स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र करणार असल्याचे वृत्त आहे. शिवसेना आणि भाजपा यांच्यातील कडवेपणा दूर झाल्यानंतर आता दोन्ही पक्षांमध्ये पुन्हा मैत्रीचे वारे वाहू लागले आहेत. त्यापार्श्वभूमीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नियोजित स्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते व्हावा यासाठी घाट घातला जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 24 फेब्रुवारी रोजी भूमिपूजन होणार आहे. आज होणाऱ्या संयुक्त पत्रकार परिषदेत यासंदर्भातील अधिकृत घोषणा होणार आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्यस्त वेळापत्रकामुळे या कार्यक्रमाची वेळी निश्चित झालेली नाही.