Balasaheb Thorat News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभांना चांगलाच वेग आला आहे. महाविकास आघाडीचे नेते घटक पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारात सक्रीय सहभाग घेताना पाहायला मिळत आहे. यातच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेला संबोधित केले. यावेळी कृपा करून तीन लाख लीडच्या गप्पा करू नका, असा सल्ला बाळासाहेब थोरात यांनी दिला.
शिर्डीची जागा शिवसेनेच्या वाटेला गेली. अनेकांना वाटले मी भांडलोच नाही. मात्र शिवसेनेने आमच्या १४ खासदारांच्या जागा आमच्याच हा पक्का निर्धार केला होता. एक जागा त्यांनी कोल्हापूरची महाराजांसाठी सोडली तर आमची सांगली गेली. जरी शिवसेनेचा खासदार झाला तरी पाठिंबा काँग्रेसलाच. मला राज्यभरातून सभांसाठी अनेक ठिकाणांहून निमंत्रण येत आहेत. आपल्याला चांगली डिमांड आहे, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
तीन लाख लीडच्या चर्चा करू नका
संगमनेरमधून लीड देण्याची जबाबदारी आमच्या कार्यकर्त्यांची आहे. पण तीन लाखांच्या मताधिक्याने निवडून येईन, हे बोलू नका. आपल्याला लढावे लागणार आहे. तीन लाख म्हटले की आमचा गडी थंड होतो, जास्त पळत नाही. त्यामुळे वाकचौरे गैरसमजात राहू नका, कृपा करा आमच्यावर. तुम्ही निवडून येणार आहे. मात्र लोकांना समजून सांगावे लागेल. त्यामुळे तीन लाख तीन लाख या चर्चा करू नका, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.
दरम्यान, मागच्या निवडणुकीत माझ्यामुळेच नांदेडला भाजपाचा खासदार निवडून आला. राज्यपाल नियुक्त १२ जणांच्या यादीत माझे नाव होते. आपल्या उमेदवाराचे नाव वाघचौरे आहे. लोक पक्ष चोरतात , लोक चिन्ह चोरतात इतकच नव्हे तर लोक काकाही सोडतात आणि बापही चोरतात, अशी टीका यशपाल भिंगे यांनी केली.