मामा-भाच्याची जोडी आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला तारणार का?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2019 01:06 PM2019-07-14T13:06:37+5:302019-07-14T13:16:35+5:30
बाळासाहेब थोरात हे गांधी कुटुंबीयांचे निष्ठावंत आणि निकटवर्तीयही मानले जातात. त्याचप्रमाणे सत्यजित तांबे हे देखील राहुल गांधींच्या निकटवर्तीयांमधील मानले जातात.
मुंबई - अनके दिवसांपासून सुरु असलेल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या चर्चेला काँग्रेस नेते आणि आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नियुक्तीने पूर्ण विराम मिळाले आहे. थोरात यांच्या नियुक्तीनंतर राज्यातील काँग्रेसचा संपूर्ण धुरा आता मामा-भाच्याच्या हातात आहे. त्याचे कारण असे की, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे हे बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. त्यामुळे मामा-भाच्याची जोडी आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला तारणार का अशीही चर्चा पहायला मिळत आहे.
बाळासाहेब थोरात हे गांधी कुटुंबीयांचे निष्ठावंत आणि निकटवर्तीयही मानले जातात. त्याचप्रमाणे सत्यजित तांबे हे देखील राहुल गांधींच्या निकटवर्तीयांमधील मानले जातात. लोकसभा निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर आता काँग्रेसचे लक्ष विधानसभा निवडणुकांकडे लागले आहेत. त्यातच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमधील अनेक नेत्यांची नावे प्रदेशाध्यक्षपदासाठी समोर आली होती. मात्र अखेर थोरात यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. एकीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद थोरात यांच्याकडे आहे तर दुसरीकडे युवक काँग्रेसचे अध्यक्षपद त्यांचे भाचे सत्यजित तांबेंकडे आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीची जवाबदारी मामा-भाच्याकडे आली असल्याचे बोलले जात आहे.
सत्यजीत तांबे यांनी महाराष्ट्र युवक काँग्रेसची जबाबदारी स्वीकारल्यापासून महाराष्ट्र पिंजून काढला आहे. त्यातच त्यांनी वेळोवेळी सरकार विरोधात आक्रमक आंदोलने सुद्धा केल्याची पहायला मिळाली. तर थोरात यांच्याकडे मोठा राजकीय अनुभूव आहे. त्यामुळे मामा-भाच्याची जोडी पुन्हा काँग्रेसला अच्छे दिन आणणार का हे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.