“खोटारड्या शिंदे-फडणवीस सरकारला आगामी निवडणुकीत धडा शिकवू”: बाळासाहेब थोरात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 10:46 AM2023-06-26T10:46:51+5:302023-06-26T10:48:07+5:30
Balasaheb Thorat: महाराष्ट्रात असलेले भाजपाचे सरकार काहीही काम करत नाही, खोटेनाटे दावे केले जात आहे, अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली.
Balasaheb Thorat: सांगली येथील कल्पद्रुम क्रीडांगण मैदानावर काँग्रेसचा महानिर्धार २०२४ शेतकरी संवाद व कार्यकर्ता मेळावा झाला. या मेळाव्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हजेरी लावली होती. भारतीय जनता पक्ष जाती-जातीत, धर्मा-धर्मात वाद घडवून सामाजिक शांतता भंग करत आहे तसेच संघ परिवाराचे लोकही धर्मा-धर्मात वाद लावून दंगे घडवतात आणि त्यात सामान्य जनता मात्र भरडली जात आहे. भारतीय जनता पक्ष म्हणजे भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार म्हणजे भाजपा असे समीकरण आहे, अशी टीका सिद्धरामय्या यांनी केली होती. यावेळी बोलताना विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली.
कर्नाटकात काँग्रेसने मोठा विजय मिळवला. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा झाली त्याचाही परिणाम कर्नाटकाच्या विजयात दिसून येतो. महाराष्ट्रात असलेले भाजपाचे सरकार काहीही काम करत नाही फक्त घोषणाबाजी, इव्हेंटबाजी, जाहिरातबाजीतून खोटेनाटे दावे केले जात आहे. या खोटारड्या शिंदे-फडणवीस सरकारला आगामी निवडणुकीत धडा शिकवू, असा निर्धार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. तसेच जत भागातील पाणी प्रश्नावर कर्नाटक सरकार मदत करणार असल्याचे आश्वासन दिले त्याबद्दल आभारी आहोत पण सीमाभागातील लोकांच्या मनात अन्यायाची भावना निर्माण होणार नाही याचीही काळजी घ्यावी, असे आवाहन थोरात यांनी केले.
महाराष्ट्रातही काँग्रेसची सत्ता आणण्याचा संकल्प
छत्तीसगड, राजस्थान, हिमाचल प्रदेश व कर्नाटकमध्ये काँग्रेस विचारांचे सरकार आहे. या राज्यात शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना राबवल्या जात आहे, नोकरीचे प्रश्न सोडवले जात आहेत. भाजपाच्या राज्यात मात्र नोकऱ्या संपवण्यात आला, आरक्षण संपवले. धनगर समाजाला २०१९ मध्ये आरक्षण देणार होते पण अजून दिलेले नाही. कर्नाटकात जसा भाजपाचा पराभव करुन काँग्रेसची सत्ता आली त्यापेक्षा मोठा विजय मिळवत महाराष्ट्रातही काँग्रेसची सत्ता आणण्याचा आमचा संकल्प आहे, असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.
दरम्यान, कर्नाटकात ४० टक्के कमिशन दिल्याशिवाय कोणतेच काम होत नव्हते. कर्नाटकच्या जनतेने भ्रष्टाचारी भाजपाला घरी बसवले, महाराष्ट्रातही शिंदे-फडणवीस सरकार अत्यंत भ्रष्ट आहे, हे भ्रष्ट सरकारही उखडून टाका व काँग्रेसची सत्ता आणा, असे आवाहन कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले.