मुंबई : पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या वृत्तपत्र आणि संज्ञापनविद्या विभागाच्या रानडे इन्स्टिट्यूटने पत्रकारीता विभागातील पदव्यूत्तर विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेच्या “Knowing RSS” या कार्यशाळेला उपस्थित राहावे अशी नोटीस बजावल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तर महाराष्ट्र विकास आघाडी सरकार असले प्रकार खपवून घेणार नाही असा इशारा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.
मागील पाच वर्षात गेल्यावेळीच्या सरकारमध्ये मुख्यंमत्री राहिलेले व विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील प्रत्येक विद्यापीठांमध्ये कुलगुरु, प्र-कुलगुरु आणि निबंधक या पदांवर संघाच्या विचाराच्या लोकांच्या नियुक्त्या केल्या असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यात आता सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेच्या कार्यशाळेला उपस्थित रहाण्याची नोटीस मिळाल्याने वेगवेगळ्या स्तरांतून प्रतिक्रीया उमटायला सुरूवात झाली आहे.
संघ विचाराच्या कुलगुरूंना पदावरून हटवा: आशिष देशमुख
तर यावर बोलताना थोरात म्हणाले की, भाजप सरकारच्या आशिर्वादाने शिक्षण क्षेत्रात घुसखोरी केलेले स्वयंसेवक आता विद्यापीठांमध्ये संघाचा प्रचार, प्रसार करत आहेत. विद्यार्थ्यांना विद्यापीठ निर्धारीत शिक्षण देण्याऐवजी संघाचा स्वयंसेवक व्हावे यासाठी प्रयत्न करत आहेत. हे गंभीर आहे याची चौकशी करणे गरजेचे असल्याचे थोरात म्हणाले.
त्याचबरोबर यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा केली आहे. ते याप्रकरणी योग्य ती कारवाई करतील. महाराष्ट्र विकास आघाडी सरकार असले प्रकार खपवून घेणार नाही, असा इशाराही यावेळी थोरातांनी दिला.