अहमदनगर जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी बाळासाहेब थोरातांचे नाव आघाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2020 12:01 PM2020-01-02T12:01:06+5:302020-01-02T12:31:55+5:30
महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांचं खातेवाटप आज संध्याकाळपर्यंत जाहीर होणार असल्याची शक्यता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वर्तवली आहे.
अहमदनगर: महाविकास आघाडीच्या खातेवाटपाकडे जिल्ह्यातील मंत्र्यांच्या नजरा लागून आहेत. पालकमंत्री पदासाठी काँग्रेसचे मंत्री बाळसाहेब थोरात,राष्ट्रवादीकडून दिलीप वळसे पाटील आणि शिवसेनेच्या कोट्यातील कॅबिनेट मंत्री शंकरराव गडाख यांची नावे चर्चेत असून थोरात यांचे नाव मात्र आघाडीवर आहे.
आघाडी सरकारच्या काळात थोरात मंत्री राहिलेले असून,कृषी व महसूल यासारख्या महत्वाच्या खात्यांचा त्यांना अनुभव आहे. तसेच राजकरणात जेष्ठ नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. याच बरोबर अहमदनगर जिल्ह्यात भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना तोडीस तोड उत्तर देणारे थोरात हे एकमेव नेते आहेत.
त्यामुळे आगामी निवडणुका आणि राजकीय घडामोडी पाहता जिल्ह्यातून विरोधी पक्ष असलेल्या भाजपला सत्तेपासून दूरू ठेवण्यासाठी पालकमंत्री पदाची जवाबदारी थोरात यांच्याकडेचं दिली जाण्याची शक्यता आहे. मात्र असे असले तरीही वळसे पाटील आणि गडाख यांच्या नावाची सुद्धा चर्चा असून अंतिम निर्णय तिन्ही पक्षातील वरिष्ठ नेते घेणार आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांचं खातेवाटप आज संध्याकाळपर्यंत जाहीर होणार असल्याची शक्यता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वर्तवली आहे. मंत्रालयात बुधवारी चार तास चाललेल्या मॅरेथॉन बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही महिती माध्यमांना दिली. सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांबाबत तिन्ही पक्षांत एकमत झालं असून खातेवाटपाचा निर्णयाच्या अंतिम स्वरूपापर्यंत तिन्ही पक्ष आले असून, आज यावर तोडगा निघणार असल्याचे सुद्धा पवार म्हणाले.