बाळासाहेब थोरात- नाना पटोले वादाचा अहवाल गुलदस्त्यात; चेन्नीथला दिल्लीला परतले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 09:05 AM2023-02-22T09:05:46+5:302023-02-22T09:06:15+5:30
नाशिक पदवीधरचा गोंधळ कुणामुळे झाला? त्या संदर्भात ते टिप्पणी करतील, तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महाराष्ट्रातील निवडणुकांविषयीचे पक्षाचे नियोजन चेन्नीथला आपल्या अहवालात मांडण्याची शक्यता आहे.
मुंबई - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्या वादासंदर्भात चौकशी करून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्नीथला हे मंगळवारी दिल्लीला परतले. चेन्नीथला काय अहवाल देणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
नुकत्याच झालेल्या नाशिक पदवीधर विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेस उमेदवारीवरून प्रदेश काँग्रेसमध्ये गोंधळ झाला होता. काँग्रेस उमेदवाराने अर्ज भरला नाही आणि अपक्ष उमेदवार निवडून आला. त्यावरून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि पक्षाचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी एकमेकांवर आरोप केले होते. या परिस्थितीचे अवलोकन करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेसचे केरळमधील ज्येष्ठ नेते रमेश चेन्नीथला यांना राज्यात पाठविले होते.
गेले तीन दिवस ते मुंबईत होते. काँग्रेसचे माजी मंत्री, प्रदेश कार्यकारिणी सदस्य, आमदार, खासदार यांना ते भेटले. परळच्या टिळक भवनामध्ये सोमवारी त्यांनी अनेकांची मते जाणून घेतली. मंगळवारी त्यांनी नरिमन पॉइंट हॉटेलमध्ये अनेकांच्या भेटी घेतल्या. त्यामध्ये ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना पाचारण केले होते. बाळासाहेब थोरात यांनाही ते येथेच भेटले.
नाशिक पदवीधरचा गोंधळ कुणामुळे झाला? त्या संदर्भात ते टिप्पणी करतील, तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महाराष्ट्रातील निवडणुकांविषयीचे पक्षाचे नियोजन चेन्नीथला आपल्या अहवालात मांडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील पक्ष संघटन मजबूत आहे. आगामी निवडणुकीला प्रदेश कार्यकारिणी खंबीरपणे सामोरे जाईल, असा विश्वास चेन्नीथला यांनी मंगळवारी प्रसिद्धी माध्यमांकडे व्यक्त केला.