मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कुठल्याही क्षणी कोसळू शकते. फार नाही तर येत्या ११ दिवसांत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार कोसळेल, असे भाकित महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा खासदार नारायण राणे यांनी केले आहे. यावरूनच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राणेंवर निशाणा साधला आहे.
थोरात म्हणाले की, नारायण राणे आता भाविष्य सांगायला लागले आहे. राणे हे भविष्यवाल्यांबरोबर गेल्यानेच अशा भविष्यवाण्या करायला लागले. पण आतापर्यंत जे भविष्य सांगत सांगत होते, त्याचं जे झालं ते यांचही होईल, असा खोचक टोला त्यांनी राणेंना लगावला.
नारायण राणे हे भाजपा खासदार कपिल पाटील यांनी आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेच्या उदघाटनासाठी भिवंडीत आले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नारायण राणेंनी राज्यात सरकार स्थापन करणाऱ्या महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. राज्यात महाविकास आघाडीने स्थापन केलेले सरकार कुठल्याही क्षणी कोसळू शकते, असे आम्हाला वाटते. कदाचित येत्या ११ दिवसांत राज्यातील सरकार कोसळेल. हे सरकार जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. तसे शेतकऱ्यांचेही प्रश्न सोडवू शकत नाही, असा आरोप त्यांनी केला होता.