Balasaheb Thorat News: सांगली, भिवंडी आणि मुंबईच्या जागेवरून महाविकास आघाडीत बिघाडी असल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. सांगलीची जागा सोडण्यास ठाकरे गट तयार नसून, काँग्रेसचा सांगलीच्या जागेवरील आग्रह कायम आहे. यावर संजय राऊतांनी केलेल्या विधानावर बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली.
मीडियाशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीतील सगळे किरकोळ वाद मिटले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा शिवसेना यांपैकी कोणीही टोकाची भूमिका घेतलेली नाही. आघाडी किंवा युतीत असताना जागावाटपावरून कार्यकर्त्यांची भावना समजून घ्यावी लागते. त्यामुळे नेत्यांना झुकावे लागते. मग समजूत काढली जाते. त्यातून मार्ग काढला जातो. नाना पटोले किंवा बाळासाहेब थोरात काही बोलत असतील तर, त्या त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. शिवसेनेतील कार्यकर्त्यांच्याही भावना काही भागात आहेत. पण आम्ही त्यांना शांत केले, असे संजय राऊत म्हणाले होते. यानंतर बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली.
सांगलीच्या जागेवर काँग्रेसचा आग्रह कायम
सांगलीच्या जागेवर काँग्रेसचा आग्रह कायम आहे. आमचे दिल्लीतील श्रेष्ठी यामध्ये भाग घेत आहेत. चर्चा करत आहेत. मला असे वाटते की, त्यातून काही ना काही मार्ग निघेल. किंबहुना लवकरच निर्णय घ्यावा लागणार आहे. आघाडीची बिघाडी होणार नाही. एकमेकांना समजून घ्यावे लागेल. त्यांनीही समजून घ्यावे, असा आमचा आग्रह आहे. आमच्याही कार्यकर्त्यांची भावना समजून घेतली पाहिजे. आता शेवटी याबाबतचा निर्णय दिल्लीतील श्रेष्ठी घेतील. ते स्वतः शिवसेनेसोबत संवाद साधतील, असे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. सत्ता टिकवण्यासाठी कितीही सभा घेतल्या तरी जनता त्यांना स्वीकारणार नाही. विजय महाविकास आघाडीचा होणार आहे. लोक फक्त ऐकायला जातात, पण मतदान करत नाही, असे सांगत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली.