'जे भाजपाच्या पोटात ते कंगनाच्या मुखात, महाराष्ट्रद्रोह्यांना जनता माफ करणार नाही'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 06:51 PM2020-09-04T18:51:00+5:302020-09-04T21:18:39+5:30

कंगनाचा बोलविता धनी कोण आहे, हे उघड असून आपल्या राजकीय स्वार्थासाठी एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी महाराष्ट्राच्या मातीशी गद्दारी केली आहे, असे आरोप बाळासाहेब थोरात यांनी भाजपावर केला आहे.

balasaheb thorat slams on kangana ranaut and bjp | 'जे भाजपाच्या पोटात ते कंगनाच्या मुखात, महाराष्ट्रद्रोह्यांना जनता माफ करणार नाही'

'जे भाजपाच्या पोटात ते कंगनाच्या मुखात, महाराष्ट्रद्रोह्यांना जनता माफ करणार नाही'

Next
ठळक मुद्देभाजपाला ना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल प्रेम आहे, ना महाराष्ट्राच्या जनतेबद्दल, त्यांना फक्त राजकीय पोळी भाजायची आहे, पण त्यांना कदापी यश येणार नाही, असेही बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

मुंबई : जे भाजपाच्या पोटात आहे, तेच गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री कंगना राणौतच्या मुखातून आणि ट्विटमधून बाहेर येत आहे. कंगनाला पुढे करून मुंबई पोलीस, मराठी माणूस आणि महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्र द्रोह्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील जनता कधीच माफ करणार नाही, असा घणाघात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

बिहार विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुंबई पोलीस आणि महाराष्ट्राच्या बदनामीचा नियोजनबद्ध कट कोणी रचला आहे, हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारविरोधात कारस्थाने करणारे आता महाराष्ट्र आणि मराठी माणसांविरोधात कट कारस्थाने करत आहेत. कंगनाचा बोलविता धनी कोण आहे, हे उघड असून आपल्या राजकीय स्वार्थासाठी एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी महाराष्ट्राच्या मातीशी गद्दारी केली आहे, असे आरोप बाळासाहेब थोरात यांनी भाजपावर केला आहे.

ज्या मुंबईने आणि महाराष्ट्राने कंगना राणौतला काम, नाव, पैसा आणि प्रसिद्धी मिळवून दिली. त्याच मुंबई आणि महाराष्ट्राची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणे हा कृतघ्नपणा आणि महाराष्ट्रातील १३ कोटी मराठी जनतेचा अपमान आहे. कंगनाने केलेल्या एकाही वक्तव्याचा भाजपाने निषेध केला नाही. त्यांचे मौन हेच त्यांचा पाठिंबा असल्याचे दाखवत आहे. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूबाबतचा मुद्दाही राजकीय करुन त्याचा लाभ उठवण्यासाठी महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावण्यापर्यंत या मंडळींची मजल गेली आहे, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

याचबरोबर, महाराष्ट्रातील काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या पक्षांचे आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून ही मंडळी अस्वस्थ आहेत. हे सरकार कोणत्याही मार्गाने खाली खेचायचे यासाठी मागील नऊ महिन्यापासून या लोकांनी सर्व उद्योग करुन पाहिले. सुरुवातीला राजभवनच्या आडून सरकार अस्थिर करण्याचे उद्योग केले, त्यात त्यांना यश आले नाही. कंगणासारख्या अभिनेत्रीला हाताशी धरुन मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचे काम केले आणि आता तर या मंडळींची मजल मुंबईला पाकव्यात काश्मीर म्हणण्यापर्यंत गेली. भाजपाला ना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल प्रेम आहे, ना महाराष्ट्राच्या जनतेबद्दल, त्यांना फक्त राजकीय पोळी भाजायची आहे, पण त्यांना कदापी यश येणार नाही, असेही बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

कंगनाचे थोबाड फोडण्याचा इशारा
कंगना राणौतला खासदार संजय राऊत यांनी सौम्य शब्दांत समज दिली. ती इथे आली तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत. उद्योजक व सेलेब्रिटी घडवणाऱ्या मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगना राणौतवर देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल करण्याची मी गृहमंत्र्यांना मागणी करणार आहे, असे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे. तत्पूर्वी संजय राऊत यांनीही कंगना राणौतवर निशाणा साधला आहे.

पोकळ धमक्या देत नाही, अ‍ॅक्शन घेतो; संजय राऊतांचा कंगना राणौतवर पुन्हा हल्लाबोल 
मी पोकळ धमक्या देत नाही, मी शिवसैनिक आहे, अ‍ॅक्शनवाला माणूस, नौटंक्या करत नाही, या काही मेंटल केस मुंबईत वाढल्या आहेत. त्यांच्यावर आरोग्य खात्याने उपचार करावे आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी कारवाई करावी, अशा शब्दात संजय राऊत यांनी कंगनावर हल्लाबोल केला. याशिवाय, धमकी वगैरे देण्याची मला सवय नाही. आम्ही अ‍ॅक्शन घेतो, महाराष्ट्रात कमवते, खाते, मुंबई पोलीस त्यांचं रक्षण करते आणि त्यांच्यावरच आरोप कोणी करत असेल तर आम्ही त्यावर आक्षेप घेऊ शकत नाही का?, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.

मुंबईत येतेय, कोणाच्या बापात हिंमत असेल तर आडवा; कंगनाचे खुले आव्हान
"मला अनेक जण मुंबईला परत न येण्याची धमकी देत ​​आहेत, म्हणून मी ठरवले आहे की, येत्या आठवड्यात 9 सप्टेंबरला मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला आहे. मी मुंबई विमानतळावर किती वाजता उतरणार, याची वेळ लवकरच सांगेन. कोणाच्या बापात हिंमत असेल तर आडवा", असे आव्हान कंगनाने दिले आहे.

कंगनाला मुंबई किंवा महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई पोलिसांबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या अभिनेत्री कंगना रानौतवर जोरदार टीका केली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आपले महाराष्ट्र आणि मुंबई पोलीस दल सक्षम आहे. त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या अभिनेत्रीचा मी तीव्र निषेध करतो. ज्यांना मुंबईत राहाणे सुरक्षित वाटत नाही, त्यांना मुंबई किंवा महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही, असे मत अनिल देशमुख यांनी व्यक्त केले आहे.

आणखी बातम्या...

- एकतर ती संस्कारानेच कृतघ्न किंवा मानसिक संतुलन ढासळलेले; धनंजय मुंडेंची कंगनाला चपराक    

-'...अन्यथा कंगनाच्या सिनेमाचे सेट जाळून टाकू', करणी सेनेचा इशारा

- कंगनाने मुंबईला शहाणपण शिकवण्याची गरज नाही; भाजपाचा 'यू-टर्न'

मुंबईत येतेय, कोणाच्या बापात हिंमत असेल तर थांबवा; कंगनाचे खुले आव्हान

पोकळ धमक्या देत नाही, अ‍ॅक्शन घेतो; संजय राऊतांचा कंगना राणौतवर हल्लाबोल     

- भाजपा सरकार म्हणजे 'नापास' विद्यार्थ्यांचा 'वर्ग', काँग्रेस नेत्याचा टोला    

Web Title: balasaheb thorat slams on kangana ranaut and bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.