मुख्यमंत्रिपदाबाबत बाळासाहेब थोरातांचं विधान; नाना पटोलेंच्या नावाला विरोध?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 09:44 AM2024-09-23T09:44:36+5:302024-09-23T09:47:34+5:30
काँग्रेसच्या विदर्भातील बैठकीत नाना पटोले हे पुढील मुख्यमंत्री असतील असा दावा काँग्रेस नेत्यांकडून करण्यात येत आहे.
नागपूर - आमच्या प्रत्येकाचे उत्साही कार्यकर्ते असतात, त्यांच्या अपेक्षा असतात. शेवटी राजकारण हे महत्त्वाकांक्षेवर चालते. त्याप्रकारे कार्यकर्त्यांची महत्त्वाकांक्षा असते. सर्वपक्षात हे आहे. मुख्यमंत्री झाला पाहिजे हा कार्यकर्त्यांचा आग्रह असतो अशाप्रकारे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी विधान केले आहे. नाना पटोले मुख्यमंत्री व्हावेत असा सूर काँग्रेसच्या नेत्यांकडून विदर्भाच्या बैठकीत निघाला होता. त्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बाळासाहेब थोरातांनी ही प्रतिक्रिया दिली.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, आमचे उत्साही कार्यकर्ते असतात निरनिराळ्या ठिकाणी वेगवेगळी नावे येत असतात त्यामुळे ते काही मानण्याचं कारण नाही. मुख्यमंत्रिपदाबाबत कार्यकर्त्यांनी ती अपेक्षा करणं हे वावगं नसते, मात्र मुख्यमंत्रिपदाबाबत आमचा जो निर्णय होईल तो आघाडी म्हणून होईल. आघाडीचा निर्णय आम्हाला मान्य असेल. मुख्यमंत्रिपदाबाबत आम्हाला वादाचा मुद्दा करायचा नाही. आम्ही आज त्यावर काहीच चर्चा करत नाही मुख्यमंत्रिपदाबाबत आम्ही अगोदर काही ठरवले नाही. महाविकास आघाडीचा जो काही निर्णय असेल तो योग्यवेळी होईल असं त्यांनी सांगितले.
नाना पटोलेंच्या नावाची चर्चा
नाना पटोले यांनी लोकसभेत कॉंग्रेसला मोठे यश मिळवून दिले होते. विधानसभेत ते राज्यात करिष्मा करतीलच. मात्र, विदर्भात सर्वात जास्त जागा जिंकून देतील व तेच मुख्यमंत्री असतील असा विश्वास कॉंग्रेसच्या बहुतांश नेत्यांनी व्यक्त केला. विदर्भात काँग्रेस नेत्यांची बैठक झाली, त्यात सर्वांनी हेच मत मांडले. अतुल लोंढे, अभिजीत वंजारी, अनिस अहमद यांनी हा मुद्दा मांडला व नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी यांनीदेखील याला दुजोरा दिला.
...तर मुख्यमंत्रिपद खेचून आणू
नाना पटोलेंनी मेहनत घेतली, विधानसभा अध्यक्षपद सोडून संघटनेचे पद घेतले, दारोदारी फिरले, राज्यात फिरले आणि काँग्रेसला चांगले दिवस आले. नाना पटोलेंमुळे हे यश मिळाले असून त्याचे बक्षीस त्यांना द्यायला हवं. नाही मिळाले तर विदर्भवाले हिसकावून घेऊ. जो मेहनत करेल त्याला फळ मिळायला हवे, ती लढाईही आपल्याला लढावी लागेल असं सांगत विकास ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदावर भाष्य केले.