आमचे काही लोक तुमच्याकडे येणार हे सांगण्यासाठी भेटलो असेन; बाळासाहेब थोरातांचा राधाकृष्ण विखेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2019 10:10 AM2019-12-29T10:10:49+5:302019-12-29T10:11:38+5:30
काँग्रेस पक्ष सोडल्यानंतरही आमच्या सुखदु:खाची चिंता करणारे मंत्री बाळासाहेब थोरातच दोन वर्षापूर्वी भाजपामध्ये प्रवेश करणार होते, असा गौप्यस्फोट राधाकृष्ण विखे यांनी केला होता.
संगमनेर : दोन वर्षांपूर्वी बाळासाहेब थोरात भाजपच्या संपर्कात होते, असा गौप्यस्फोट राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना भाजपच्या नेत्यांना मी भेटलो असा आरोप होतोय. आमचे काही लोक तुमच्याकडे येणार आहेत हे सांगण्यासाठी भेटलो आणि तसेच घडले, असा टोला थोरात यांनी लगावला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरात शनिवारी संगमनेरात आले होते. त्यावेळी त्यांनी हे प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, अशा वक्तव्यांना महत्व देण्याची गरज नाही. सत्ता बदलली आता कोण कोण बदलेल हे सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळेच त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली असावी, असा टोला ही थोरात यांनी विखे यांना लगावला. जिल्ह्यात जे काही आव्हान येईल त्याला सामोरे जाणार असून काँग्रेसच्या विचाराने आजपर्यंत मी काम करत आलो आहे आणि यापुढेही करत राहणार आहे, असे थोरात म्हणाले.
विखे पाटलांनी काय सांगितले होते...
माझ्या बदनामीचे षड्यंत्र असून काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याच्या चर्चाही निरर्थक आहेत. या विरोधात आपण गुन्हा दाखल केला आहे. काँग्रेस पक्ष सोडल्यानंतरही आमच्या सुखदु:खाची चिंता करणारे मंत्री बाळासाहेब थोरातच दोन वर्षापूर्वी भाजपामध्ये प्रवेश करणार होते, असा गौप्यस्फोट राधाकृष्ण विखे यांनी केला. त्यासाठी त्यांनी दिल्लीत कोणाच्या भेटी घेतल्या त्यांची नावे आम्हाला जाहीर करायला लावू नका, असा इशारा त्यांनी दिला.
विखे पाटील म्हणाले, काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या न झालेल्या भेटीची चर्चा जाणीवपूर्वक सुरु करुन मला बदनाम करण्याचा काहींचा हेतू आहे. या बदनामीकारक चर्चेच्या मुळापर्यंत जाण्याचा निर्णय मी घेतला आहे. पक्षाला मिळालेल्या यशात थोरातांचे कर्तृत्व शून्य आहे. त्यांना सर्व अपघाताने मिळाले आहे. विरोधी पक्षनेता म्हणून केलेल्या कामामुळेच राज्यात काँग्रेसला अच्छे दिन आले आहेत. मागील साडेचार वर्षे थोरात गायबच होते, असा आरोपही विखे केला आहे.