Balasaheb Thorat: गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत विविध चर्चाही सुरू झाल्या होत्या, पण आज स्वतः थोरात यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
काय म्हणाले थोरात?आज माध्यमांशी बोलताना बाळासाहेब थोरात यांना त्यांच्या नाराजीबाबत प्रश्न विचारला असता थोरात म्हणाले, 'कोणी सांगितलं मी नाराज होतो? मी नाराज होतो, हे मला माध्यमांमधून समजलं. मी नाराज असल्याचे कधीच बोललो नाही. प्रत्येक संघटनेत पत्र व्यवहार होत असतो, तसाच आम्हीदेखील केला,' असे स्पष्टीकरण थोरात यांनी दिले. त्यामुळे आता नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
अशोक चव्हाणांची प्रतिक्रियापटोले व थोरात यांच्यात सुरू असलेला वाद हा पेल्यातील वादळ आहे. काँग्रेसमध्ये मोकळे वातावरण आहे. नाना पटोले माझे ऐकतात. तुमचं काय ते माहिती नाही. फक्त त्यांना समजावून सांगण्याची पद्धत जमली पाहिजे, असे म्हणत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसमधील वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
नेमका वाद कशामुळे?विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी नाशिक पदवीधर मतदारसंघात बंडखोरी केल्यामुळे सत्यजित तांबे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. तेव्हापासून त्यांचे मामा बाळासाहेब थोरात नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. विशेष म्हणजे, या निवडणुकीत थोरातांनी पक्षाचा प्रचारही केला नाही. तसेच, या काळात माध्यमांना प्रतिक्रिया देणेही टाळले. आता त्यांनी आपण नाराज नसल्याचे स्पष्ट केले आहे.