बाळासाहेब थोरातांचा लेटरबॉम्ब, हायकमांडला पाठवलेल्या पत्रात म्हणाले, "असंच सुरू राहिल्यास काँग्रेसमध्ये दोन गट पडतील’’
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 09:23 AM2023-02-06T09:23:29+5:302023-02-06T09:24:23+5:30
Balasaheb Thorat: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी समाधानकारक झाली असली तरी नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष निवडून आलेल्या सत्यजित तांबेंवरून पक्षात धमासान माजलेले आहे.
मुंबई - नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी समाधानकारक झाली असली तरी नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष निवडून आलेल्या सत्यजित तांबेंवरून पक्षात धमासान माजलेले आहे. पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर अपक्ष निवडणूक लढवत सत्यजित तांबे यांनी बाजी मारली होती. या विजयानंतर सत्यजित तांबे यांनी पक्षातील राजकारणावरून नाना पटोलेंवर निशाणा साधला होता. त्यानंतर आता बाळासाहेब थोरात यांनीही लेटरबॉम्ब टाकत महाराष्ट्र काँग्रेसच्या राजकारणात खळबळ उडवली आहे.
सत्यजित तांबेंनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे काय बोलतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले होते. दरम्यान, बाळासाहेब थोरात यांनी सत्यजित तांबेंवरून जे राजकारण झालं, व्यथित करणारं असल्याचं म्हटलं आहे. तसेच नाना पटोलेंसोबत काम करणं अशक्य झालंय, असंच सुरू राहिल्यास काँग्रेसमध्ये दोन गट पडतील, असा सूचक इशाराही बाळासाहेब थोरात यांनी पक्षश्रेष्ठींना लिहिलेल्या पत्रामधून दिल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.
दरम्यान, प्रसारमाध्यमांशी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, राज्यात नुकतीच विधान परिषदेची निवडणूक झाली. त्यात खूप राजकारण झालं. या निवडणुकीत सत्यजित चांगल्या मताने विजयी झाला. त्याचं आम्ही अभिनंदन करतो. मात्र या निवडणुकीत जे राजकारण झालं ते मला व्यथित करणारं आहे. त्याबाबतच्या भावना मी पक्षश्रेष्ठींना कळवल्या आहेत, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
विधानसभेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये काँग्रेसने सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र तिथून त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत सत्यजित तांबे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना पराभूत करत विजय मिळवला होता.