मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा हिंदू व्होटबँक तयार केली होती, असे विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यावरून चंद्रकांत पाटील यांच्यावर आता टीका होऊ लागली आहे. राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही आता चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी केलेले विधान चुकीचे आहे. त्यांनी अभ्यास करण्याची गरज आहे, असा टोलाही बाळासाहेब थोरात यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे आहे.
चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, शिवाजी महाराज श्रद्धास्थान आहेत, त्यांना मर्यादित, छोटे करू नये, ते व्यापक होते. रयतेचे राजे होते. चंद्रकांत पाटील यांचे शिवरायांबाबतचे विधान चुकीचे आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी काही गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे.
तसेच राज्यातील सत्ताबदलाबाबत चंद्रकांतदादांनी केलेल्या विधानावरूनही बाळासाहेब थोरात यांनी टोला लगावला आहे. ते म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांना रात्री स्वप्न पडतात आणि सकाळी ते बोलत असतात, त्यामुळे सत्तते येण्याचे स्वप्न पडत असतात.
यावेळी बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही पाठिंबा दिला. ते म्हणाले की, नाना पटोले आक्रमक आहेत, शेवटी राजकारणामध्ये सर्वच व्हरायटी लागते. आम्हाला जसे नेतृत्व पाहिजे तसे मिळाले. नाना पटोलेंच्या आक्रमकपणामुळे पक्षात कोणी नाराज झाले तरी त्यांच्या लक्षात येईल. तसेच तेअनुभवी नेते आहेत. ते काँगेसच्या मुशीतील आहेत, म्हणून खासदारकी सोडून काँग्रेसमध्ये आलेत, त्यांना मी सल्ला देणार नाही.