मुंबई : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा काल मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) झाला. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर विरोधी पक्षांकडून आता राज्य सरकारवर टीका होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर, अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांच्या मंत्रीपदावरुन विरोधक टीका करत आहेत. दरम्यान, शिवसेना (Shivsena) नेत्या किशोरी पेडणेकर यांनीही शिंदे गटातील मंत्र्यांवर आणि भाजपवर निशाणा साधला आहे.
"जे मंत्री महोदय झाले, त्यांचा पाळणा वेगवेगळ्या पक्षात हलला. त्यानंतर ते आमच्याकडे आले, त्यांचाही आम्ही बहुमान केला. शिवसेना आमचीच, धनुष्यबाण आमचंच, बाळासाहेबही आमचेच असे म्हणणाऱ्यांना मंत्रीपदाची शपथ घेताना बाळासाहेबांची आठवण झाली नाही. मंत्रीपदाची शपथ घेऊन 12 तासांच्यावर वेळ उलटून गेला. पण एकही आमदाराला बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर जाऊन दर्शन घ्यावे, असे वाटले नाही. याचा अर्थ फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी बाळासाहेबांचे नाव वापरायचे आणि बाळासाहेबांच्या घराण्याला, ठाकरे घराण्याला संपवायचे कसे, याचा विडा यांनी उचलला आहे", असा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केला.
याचबरोबर, शिंदे-फडणवीस सरकारमध्ये व्यावसायिक मंगलप्रभात लोढा यांना मंत्रीपद दिल्यामुळे किशोरी पेडणेकर यांनी भाजपवर टीका केली आहे. बहुभाषिक मुंबईत, मराठी मुंबईत मंगलप्रभात लोढा हे विकासक आहेत, आमदार आहेत, भाजपने त्यांना मंत्रीपद दिले, पण आमच्यातून गेलेले, शिवसेनेला आई म्हणणारे मुंबईतील एकाही आमदाराला मंत्रीपद दिले नाही, ही मुंबईची शोकांतिका आहे, असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर जवळपास एक महिन्याहून अधिक काळ मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. त्यामुळे विरोधी पक्षांतर्फे अनेकदा राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सरकारला घेरण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, अखेर रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार मंगळवारी पार पडला. पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात एकनाथ शिंदे यांच्या गटातील 9 आणि भाजपच्या 9 आमदारांना मंत्रिमंडळाची शपथ घेतली आहे.
'या' नेत्यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथशिंदे गटातील आमदार तानाजी सावंत, उदय सामंत, संदीपान भुमरे, दादा भुसे, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, शंभूराज देसाई, संजय राठोड, गुलाबराव पाटील यांनी आज कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. तर भाजपमधून गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, सुरेश खाडे, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित आणि मंगलप्रभात लोढा यांनी यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.
थोडी नाराजी तर आहेच - बच्चू कडू शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात अपक्ष आणि मित्रपक्षांना सहभागी करून घेण्यात आल्याचे दिसत नाही. त्यावरुन आता राजकीय चर्चा सुरू झाल्या आहे. 'प्रहार' संघटनेचे बच्चू कडू यांनी आपली नाराजी बोलून दाखवली. "नाराजी नाही असं नाही. थोडी नाराजी तर आहेच. कारण जो उशीरा आला त्याला पहिल्या पंगतीमध्ये बसवले गेले. आणि जो पहिला गेला त्याला शेवट बसवले जात आहे. पण राजकारणात थोडं कमी जास्त होत असते", असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.