Raj Thackeray : मराठी रंगभूमीवर लवकरच 'बाळासाहेबांचा राज' हे नवीन नाटक रसिकांच्या भेटीस येत आहे. २३ जानेवारी रोजी प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिरात नाटकाचा पहिला प्रयोग होणार आहे. हे दोन अंकी नाटक असणार आहे. मनसे नेत्यांच्या सहकार्याने हे नवं नाटक बसवण्यात आलं आहे. अर्थातच नाटकाच्या नावामुळे याची उत्सुकता अधिकच ताणली आहे. आज नाटकाचं पोस्टर अनावरणही करण्यात आलं.
जोगेश्वरी मधील काही कलाकारांनी हे नाटक बसवलं आहे. मनसे समर्थक मोठ्या संख्येने नाटकाला येण्याची शक्यता आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे पुतणे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं नातं रंगभूमीवर बघायला मिळणार का याची उत्सुकता सर्वांनाच आहे. बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांच्या नात्यावर बोलणारी अशी नाटक कलाकृती पहिल्यांदाच समोर येत आहे.
नाटकाचे पोस्टर भगव्या रंगात असून बाळासाहेब आणि राज ठाकरे यांचा फोटो पोस्टरवर दिसत आहे. अनिकेत बंदरकर यांनी नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. तर गणेश कदम यांनी निर्मिती केली आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर, राजू पाटील, अमेय खोपकर आणि अविनाश जाधव यांच्या मार्गदर्शनाने नाटकाची निर्मिती करण्यात आली आहे. २३ जानेवारी रोजी दुपारी साडेचार वाजता 'बाळासाहेबांचा राज' नाटकाचा पहिला प्रयोग होणार आहे.