Maharashtra Politics: राज्यासह देशात दिवाळी मोठ्या उत्साहात, आनंदात आणि जल्लोषात साजरी केली जात आहे. दिवाळीनिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. मात्र, सर्वाधिक चर्चा आहे ती, मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र आले याची. यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. यातच बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी यावर भाष्य करताना, मनसे, भाजप आणि शिंदे गटाची युती होण्यास कोणतीही अडचण नाही, असे म्हटले आहे.
काय शिंदे-फडणवीस सरकार, काय सणासुदीचे दिवस अन् काय तो महाराष्ट्रात जिकडे तिकडे आनंदी आनंद!, या आपल्या खास शैलीत दिवाळीच्या शुभेच्छा देताना, मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमाबाबत प्रतिक्रिया दिली. मनसे बरोबर युती करण्याला कोणतीही अडचण नाही. तिन्ही पक्षाचा बेस हिंदुत्वाचा आहे. त्यामुळे या एका आधारावर या तिन्ही नेत्यांना एकत्र येण्यासाठी राजकारणात मला कोणतीही अडचण वाटत नाही, असे शहाजीबापू पाटील म्हणाले.
माझ्या मंत्रिपदाबाबत निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील
मंत्रिमंडळ विस्तार काहीच दिवसात होऊ शकतो, अशी चर्चा आहे. यावर बोलताना, बरेच राजकीय विश्लेषक, जाणकार मंडळी येऊन भेटतात. त्यांचे म्हणणे आहे की, १९९५ साली आमदार असलेले काही मोजके नेते आहेत. त्यामुळे तुम्ही ज्येष्ठ राजकीय नेते आहात. तुम्ही महाराष्ट्र फिरला आहात. तुम्हाला अनुभव आहे. तुमच्यासारख्या अनुभवी नेत्याला मंत्रिपद मिळाले पाहिजे, असे लोकं मला सांगतात. प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघातील जनतेला वाटते. आपला आमदार मंत्री झाला पाहिजे, तसे माझ्या मतदार संघातील लोकांनाही वाटते,असे शहाजीबापू पाटील यांनी सांगितले. मंत्रिपदाबाबत निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझा निर्णय घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, नामदार असो किंवा नसो. माझी सर्वांत मोठी ओळख एकनाथ शिंदेंचा कडवा सैनिक ही आहे. मला राजकारण करण्यासाठी ही ओळख आणि व्याख्या पुरेशी आहे. त्यामुळे मी चिंता करत नाही, असे शहाजीबापू पाटील यांनी नमूद केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"