Maharashtra Politics:एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटाला राज्यभरातून पाठिंबा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. केवळ शिवसेना नाही, तर काँग्रेस, राष्ट्रवादीमधीलही नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर शिंदे गटात प्रवेश करताना दिसत आहेत. पक्ष संघटना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) बैठका, दौरे यांवर भर देत आहेत. दिवसेंदिवस शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्ष वाढताना दिसत आहेत. यातच अब्दुल सत्तार यांच्यावर केलेल्या टीकेवरून आता आदित्य ठाकरेंच्या दारू पार्ट्यांचे व्हिडिओ दाखवू का, असा थेट इशारा शिंदे गटाने दिला आहे.
काही दिवसांपूर्वी राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी एका अधिकाऱ्याला तुम्ही दारू पिता का? अशी विचारणा केली. त्यावर राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सडकून टीका केली आहे. कृषीमंत्री दारू घेणार का? असे विचारतात यावरून काय ते समजा असे त्यांनी म्हटले होते. आदित्य ठाकरे यांच्या या टीकेवर शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी पलटवार केला आहे.
आदित्य ठाकरेंच्या दारू पार्ट्यांचे व्हिडिओ दाखवू का?
प्रसारमाध्यमांशी बोलताना किरण पावसकर म्हणाले की, काहीही झाले तरी मंत्र्यांचा राजीनामा मागत आहेत. आता अब्दुल सत्तारांचा राजीनामा मागत आहेत. हे सत्तार तुमच्याकडे असताना शिवसेना भवनात पहिल्या रांगेत बसायचे. तेव्हा तुम्हाला आवडत होते, असा टोला लगावत, तुम्हाला दारुच्या पार्ट्यांचे किती व्हिडिओ बघायचे आहेत? आदित्य ठाकरे यांच्या मिटिंग सुरू असताना दारु पार्ट्या व्हायच्या. या पार्ट्यांचे किती व्हिडिओ बघायचे आहेत? जर अशा पद्धतीने जाणार असाल. तर आम्हाला व्हिडीओ दाखवावे लागतील, असा इशारा किरण पावसकर यांनी दिला.
दरम्यान, वरूण सरदेसाई देखील राजीनामा मागू लागले आहेत. वरूण सरदेसाई कोणाचा राजीनामा मागत आहेत? जे कधी पंचायत समितीच्या निवडणुकीतही निवडून आले नाहीत. ते राजीनामा मागत आहे, असा टोला त्यांनी वरूण सरदेसाई यांना लगावला. उदय सामंत ठाकरे सरकारसोबत होते तोपर्यंत चांगले होते. मग अशा तीन महिन्यात काय झाले की ते ना आवडते झाले, अशी विचारणाही पावसकरांनी केली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"