Maharashtra Politics: आताच्या घडीला राज्यातील राजकारणात विविध मुद्दे तापताना दिसत आहेत. यातच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे अडीच तास चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राजकारणात तडजोड करावी लागते. त्यानंतर युती होते, असे शिंदे गटातील नेत्याने म्हटले आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. तसेच महाविकास आघाडीत येण्यास उत्सुक असल्याचे म्हटले होते. मात्र, अद्यापही महाविकास आघाडीतील प्रकाश आंबेडकर यांच्या समावेशाबाबत प्रश्नचिन्ह आहे. यातच प्रकाश आंबेडकर यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यामुळे चर्चा सुरू झाली आहे. यातच शिंदे गटातील नेते संजय शिरसाट यांनी प्रकाश आंबेडकरांना सल्ला दिला आहे.
राजकारणात तडजोड करुनच युती करावी लागते
प्रकाश आंबेडकर यांना युती करायची आहे. मात्र कोणाबरोबर करायची हे त्यांनी ठरवले पाहिजे. उद्धव ठाकरे यांच्या बरोबर युती करण्यासाठी राष्ट्रवादी नको. आमच्या बरोबर युती करण्यासाठी भाजप नको असे त्याचे मत आहे. त्यामुळे त्यांनी लवकर आपली भूमिका स्पष्ट करावी. राजकारणात कुठेतरी तडजोड करावी लागते. तडजोडीनंतरच युती होत असते, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे आणि आमच्यात चार भिंतीत एक कमिटमेंट झाली आहे. यात जागा वाटपावरही चर्चा झाली आहे. आमच्यात युती ठरली आहे, फक्त ती पब्लिकली जाहीर कधी करायची हे उद्धव ठाकरे यांच्या हातात असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. काँग्रेसला आणि शरद पवारांना माझ्या एवढा फारसा ओळखणारा दुसरा नेता नसेल. त्यामुळे हे तुम्हाला फसवतील असे मी सांगितले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने लोकांशी खरे बोलावे. जर खोटेच बोलत राहिले तर जे जे काही चाललेय ते लोकांसमोर आणल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही प्रकाश आंबेडकरांनी दिला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"