Maharashtra Politics: अलीकडे झालेल्या विधान परिषदेच्या पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीने मुसंडी मारली, तर भाजपला चांगली कामगिरी करता आली नसल्याचे पाहायला मिळाले. यातच भाजप-शिंदे गटात यावरून काही मतभेद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दुसरीकडे ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील आरोप-प्रत्यारोप तीव्र होताना दिसत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या आव्हानावर शिंदे गटाने प्रत्युत्तर दिले आहे.
हिंमत असेल तर राजीनामा देऊन वरळीतून लढवून दाखवा. तुम्ही निवडून कसे येता हे पाहतो, असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना दिले. आदित्य ठाकरेंच्या आव्हानानंतर शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी ठाकरे गटावर पलटवार केला आहे. पराभव व्हावा अशी तुमची इच्छाच असेल तर आम्ही तुमच्याविरोधात लढायला तयार आहोत. एकनाथ शिंदे यांना तुमच्या विरोधात लढण्याची गरज नाही, असे आव्हानच शीतल म्हात्रे यांनी दिले.
आमच्यासारखी लोक ते तुमच्यासोबत लढायला तयार आहेत
शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात शीतल म्हात्रे यांनी आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिले. आदित्य ठाकरे तुम्ही वरळीतून आव्हान देत आहात हे ऐकले. तुम्ही आव्हान देण्याची गरज नाही. एवढीच इच्छा असतील तर एकनाथ शिंदे साहेबांचे जे कट्टर सैनिक आहेत, आमच्यासारखी लोक ते तुमच्यासोबत लढायला तयार आहेत, असे शीतल म्हात्रे म्हणाल्या. तसेच तुम्हाला एक प्रश्न विचारते. वरळीतून आपल्याला ६ हजारांच्यावर नोटाची मते मिळाली आहेत. तुम्ही ज्या वरळीचे आमदार आहेत, तिथे तुमचे साधे जनसंपर्क कार्यालय नाही. लोकांना प्रश्न घेऊन जायचे असेल तर तुम्हाला भेटता येत नाही अन् तुम्ही वरळी ए प्लस करायला निघाला आहात, असा टोलाही त्यांनी लगावला.
दरम्यान, तुम्हाला त्या वरळीत दोन अधिक आमदार द्यावे लागले. एका वरळीत तीन तीन आमदार आहेत. तरी सुद्धा तुम्हाला माजी नगरसेवक संतोष खरात सारखी व्यक्ती ठाकरे गटाला सोडून एकनाथ शिंदे यांच्याकडे आले. तुम्हाला धमकी देण्याचीच इच्छा असेल, तुमचा पराभव व्हावा अशी तुमची इच्छा असेल तर त्यासाठी आमच्या सारखे शिवसैनिक वरळीतून लढायला तयार आहेत. त्यासाठी शिंदे साहेबांना वरळीच्या मैदानात उतरण्याची गरज नाही, या शब्दांत शीतल म्हात्रे यांनी आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"