Maharashtra Politics: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानाचे पडसाद अद्यापही उमटत आहेत. महाविकास आघाडीसह अन्य नेतेही राज्यपाल हटाव या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसत आहेत. उदयनराजे आणि संभाजीराजे यांनीही आक्रमक पवित्रा घेत राज्यपाल कोश्यारींवर सडकून टीका केली आहे. यातच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी परत जाण्याच्या तयारीत असल्याचा दावा शिंदे गटातील एका आमदाराने केला आहे.
संभाजीराजेंनी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट करत, जोपर्यंत कोश्यारी यांना महाराष्ट्रातून बाहेर काढले जात नाही, तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरुच ठेवू. भगतसिंह कोश्यारी यांच्या राज्यपालपदावरून हकालपट्टी होत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असा थेट इशारा संभाजीराजेंनी दिला आहे. राज्यपाल वेळोवेळी अपशब्द काढतात. यावर भाजपचे सरकार कसे शांत राहू शकते. भाजपची दुटप्पी भूमिका आहे. कोश्यारी यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी संभाजीराजेंनी केली आहे. यानंतर आता शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्यपालांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी परत जाण्याच्या तयारीत
कुठल्याही पक्षाचा कार्यकर्त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करु नये. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान सहन केला जाणार नाही. शिवाजी महाराज सगळ्यांचे दैवत आहेत. त्यांचा मान राखणे हे कर्तव्य आहे, अशी भूमिका खासदार श्रीकांत शिंदे यांनी मांडली आहे. त्यामुळे कितीही मोठा किंवा छोटा कार्यकर्ता असो, बोलताना तारतम्य बाळगले पाहिजे. राज्यपाल परत जाण्याच्या तयारीत आहेत, असे भरत गोगावले यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत काही दिवसांपूर्वी वादग्रस्त विधान केले होते. राज्यपालांच्या या विधानामुळे राजकीय पक्ष आक्रमक झाले आहेत. खासदार उदयनराजे भोसले यांनीही या विरोधात नाराजी व्यक्त केली होती. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वराज्य पक्षाच्या वतीने राज्यपालांविरोधात आक्रमक भूमिका घेत आंदोलने करण्यात आली होती. अद्यापही राज्यपालांविरोधातील राजकीय पक्ष आक्रमक आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदमुक्त केले जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"