Maharashtra Politics: एका डायलॉगमुळे प्रचंड लोकप्रियता मिळालेले बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahaji Bapu Patil) राज्यभरातील राजकारणात चांगलेच सक्रीय झाल्याचे पाहायला मिळत आहेत. राज्यातील अनेक ठिकाणी दौऱ्यावर असलेल्या शहाजीबापू पाटील यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, यानिमित्ताने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आल्याचे बोलले जात आहे.
गुरसाळे येथे पार पडेलेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या मोळी पूजन प्रसंगी ते बोलत होते. या वक्तव्यानंतर काय झाडी, काय डोंगर या संवादामुळे राज्यात चर्चेत आलेल्या आमदार शहाजीबापू पाटील यांनी विधानसभा निवडणूक रणांगणातून काढता पाय घेतला की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.
नेमकं काय म्हणाले शहाजीबापू पाटील?
सांगोला विधानसभा मतदारसंघातून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांना आमदार करा आणि मला तुमच्यासारखे विधान परिषदेवर पाठवा. अभिजीत पाटील यांच्यासाठी पंढरपूरमधून परिचारक, मंगळवेढ्यातून अवताडे तर माढ्यामधून बबनदादा म्हणतेय माझा पोरग भाजपमध्ये पाठवतो. आपले झाडी डोंगर अस झालंय की आपल्या काय नांदेडमध्ये गेले की गर्दी, कोकणात गेले तरी गर्दी. त्यामुळे मला तुमच्यासारखे विधानपरिषदेवर घ्या आणि अभिजितला सांगोल्यात उमेदवारी द्या, अशी जाहीर मागणी शहाजीबापू पाटील यांनी प्रवीण दरेकर यांच्याकडे केली. या कार्यक्रमाला प्रवीण दरेकर उपस्थित होते.
दरम्यान, शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पाटील यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. दोन राऊतांवर माझा खूप राग आहे. या दोन राऊतांनी आमचे वाटोळे केले, असा आरोप शहाजीबापू पाटील यांनी केला आहे. राऊतांचा निवडणुकीतील पराभव अटळ आहे, असा दावाही शहाजीबापू पाटील यांनी केला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"