Maharashtra Politics: केवळ एका डायलॉगमुळे देशभरात लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेले बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी राज्यातील अनेक भागांना भेटी दिल्या. तसेच विविध मुद्द्यांवर रोखठोक शब्दांत प्रतिक्रियाही दिल्या. शहाजीबापू पाटील (Shahaji Bapu Patli) सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका करत असल्याचे पाहायला मिळते. सन १९९९ मधील एक किस्सा सांगताना शहाजीबापू पाटील यांनी शरद पवारांवर निशाणा साधला.
सोलापुरातील एका कार्यक्रमात बोलताना, जनतेची सेवा हीच भगवंताची सेवा असे आजवर मानत आलो आहे. सन १९९९ मध्ये माझा पराभव झाला. या पराभवानंतर इथे जमलेली माझ्या मतदारसंघातील जनताच तुम्हाला सांगेल, माझ्या बायकोला साधी नवी साडी देखील मिळत नव्हती. १९ वर्ष सातत्याने घरात गरिबी होती. परंतु मी जनतेचे प्रश्न सोडवण्यात कुठेही कमी पडलो नाही, असे शहाजीबापू पाटील म्हणाले.
माझ्या गरिबीच्या काळात शरद पवार कुठे होते?
राजकारणाच्या चढाओढीत माझी संपत्ती मला विकावी लागली त्याचही मला दु:ख वाटत नाही. मात्र माझ्या गरिबीच्या काळात मी पक्षाचा कार्यकर्ता असूनही शरद पवार आणि अजित पवार हे माझ्यासोबत नव्हते याचे शल्य मला आयुष्यभर बोचत राहील, असे शहाजीबापू पाटील यांनी म्हटले आहे. तसेच गुवाहाटीत असताना एका कार्यकर्त्याशी संवाद साधताना, माझ्या बायकोला साधी एक साडी घेणे शक्य झाले नाही, असे म्हटले होते. यानंतर राष्ट्रवादीच्यावतीने शहाजीबापू पाटील यांच्या पत्नीला एक साडी भेट पाठवण्यात आली होती. यावर बोलताना, मी ती साडी घेतली नाही, कारण माझी जेव्हा हलाकीची परिस्थिती होती तेव्हा कुणीही माझ्यासोबत नव्हते, असे शहाजीबापू पाटील यांनी म्हटले आहे.
दरम्यान, शहाजीबापू पाटील यांनी यावर भाष्य करताना, मनसे, भाजप आणि शिंदे गटाची युती होण्यास कोणतीही अडचण नाही, असे म्हटले आहे. मनसे बरोबर युती करण्याला कोणतीही अडचण नाही. तिन्ही पक्षाचा बेस हिंदुत्वाचा आहे. त्यामुळे या एका आधारावर या तिन्ही नेत्यांना एकत्र येण्यासाठी राजकारणात मला कोणतीही अडचण वाटत नाही, असे शहाजीबापू पाटील म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"